
रत्नागिरी : विवाहितेच्या नावे सोशल मीडियावर बनावट खाते उघडून त्याद्वारे महिलेच्या नातेवाईक तसेच मित्र-मैत्रिणींना अश्लील भाषेत चॅटिंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. चार महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून, या प्रकरणी अज्ञाताविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताने २३ मार्च ते ५ जून या कालावधीत या विवाहितेच्या नावाचे बनावट खाते उघडले. त्यानंतर महिलेच्या सोशल मीडियावरील खात्यावरील नातेवाइकांशी तसेच मित्र-मैत्रिणींशी अश्लील भाषेत चॅटिंग केले. या प्रकरणी अज्ञाताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ७९ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलिस अधिक तपास करत आहेत.