
शिवसेना नेत्या अपुर्वा सामंत यानी केली पहाणी
राजापूर / प्रतिनिधी – राजापूर तालुक्यातील सागवे, नाखेरे येथील रस्ता कामाच्या उत्खननात सापडलेल्या तोफेची दखल शिवसेनेच्या युवा नेत्या अपूर्वा सामंत यांनी घेतली आहे. शुक्रवारी त्यांनी सागवे परीसरात जावून सापडलेल्या तोफेची पहाणी केली. सदर तोफेचे त्याच परीसरात जतन व्हावे त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक सागवे येथे आयोजीत करण्याबाबतचे सुतोवाच अपूर्वा सामंत यांनी केले.
सागवे, नाखेरे येथे रस्त्याच्या कामादरम्यान सुरु असलेल्या खोदकामात एक तोफ सापडली होती.सदर तोफ शिवकालीन युगातील असल्याची चर्चा देखील सुरु होती. सागवे, नखेंरे परीसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यदलाशी संबंधित सरदार तेथे वास्तव्य करून होते. त्यामुळे कदाचित त्यांच्या काळातील ती सापडलेली तोफ असावी असे क यास व्यक्त होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सापडलेल्या तोफेबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल शिवसेनेच्या युवा नेत्या अपूर्वा सामंत यांनी घेतली आणि शुक्रवारी सागवे, नाखेरे येथे भेट देवून तोफेची पहाणी केली.
त्यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे संघटक भरत लाड,शिवसेनेचे नि्रीक्षक संदेश पटेल, ओंकार पेडणेकर आदी उपस्थित होते.त्यावेळी अपूर्वा सामंत यांनी आजूबाजूच्या परीसराची पहाणी देखील केली.
दरम्यान खोदकामात सापडलेली तोफ हा ऐतिहासिक वारसा असून त्याचे त्याच भागात जतन झाले पाहिजे अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.त्यासाठी आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठकीचे सागवे येथे आयोजन करून सापडलेल्या तोफेचे सन्मानाने जतन व्हावे यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली.
राजापूर तालुक्याला इतिहासकालीन वारसा लाभला आहे. ऐतिहासिक तालुका अशी ओळख आहे. त्या पार्श्वभुमीवर खोदकामात सापडलेल्या तोफेचे जतन त्याच परीसरात झाल्यास भविष्यात राजापूर तालुक्याची पर्यटनात्मकदृष्टया आणखी महत्व वाढणार आहे.
****************
सागवे, नाखेरे परीसराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्या काळी प्रसिद्ध बंदर या परीसरात होते. मोठमोठीं जहाजे या बंदरात लागत असत. त्यामुळे ही सापडलेली तोफ पहाता या परीसरात आणखी ऐतिहासिक ठेवा सापडू शकतो त्याचा विचार करून पुरातत्व विभागाने या परीसरावर खास लक्ष केंद्रित करून सर्व्हेक्षण करावे आवश्यकतेनुसार उत्खनन करावे.- संदेश पटेल,शिवसेना निरिक्षक