चिपळूणमध्ये वाळू भरण्याच्या वादातून तिघांना मारहाण…

Spread the love

चिपळूण : तालुक्यातील नांदिवसे-गणेशपूर रस्त्यावर वाळू भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने बाप-लेकासह तिघांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत लोखंडी अवजाराने वार करण्यात आले असून, जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. ही घटना ०१ जून रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणी हसनसाब जलालसाब मुल्ला (वय ३२, रा. खेडी, ता. चिपळूण, मूळ कर्नाटक) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ते आपल्या ट्रॅक्टरमधून वाळू आणण्यासाठी गेले होते. वाळू भरून गणेशपूर येथे परत येत असताना त्यांचा १३ वर्षांचा मुलगा मेहबूब हसन मुल्ला आणि शेजारी राहणारे लक्ष्मण चंद्रकांत चव्हाण हे दुपारचा जेवणाचा डबा घेऊन घटनास्थळी आले. त्याचवेळी आरोपी बाबू जगन्नाथ झोरे (५५, रा. नांदिवसे वाकरी धनगरवाडी, ता. चिपळूण) हा तेथे आला. त्याने मेहबूबला रागाने विचारले, “तुझा वडील हसन मुल्ला कुठे आहे, तो मला दाखव.” असे बोलून त्याने मेहबूबला शिवीगाळ केली आणि तेथील दगड उचलून त्याच्या छातीवर मारला. तसेच, पोटात जोराची लाथ मारून त्याला खाली पाडले. त्यानंतर आजूबाजूचे दगड उचलून फेकून मारले असता, त्यापैकी एक दगड मेहबूबच्या उजव्या पायाला लागून तो जखमी झाला.

हा प्रकार पाहून फिर्यादी हसनसाब मुल्ला यांनी घटनास्थळी येऊन आरोपी बाबू झोरेला जाब विचारला. त्यावेळी आरोपीने त्यांना “तू या ठिकाणी वाळू कशासाठी भरण्यास आलास? तुझ्या ट्रॅक्टरमधील वाळू कोणाची आहे?” असे रागाने आणि शिवीगाळ करत विचारले. फिर्यादीने ट्रॅक्टरमधील वाळू शशिकांत शिंदे यांची असल्याचे सांगितल्यावर आरोपीला आणखी राग आला. त्याने हातात दगड घेऊन फिर्यादी हसनसाब यांच्या छातीवर आणि पाठीवर फेकून मारले.

यावेळी साक्षीदार निजाम मुल्ला सोडवण्यासाठी पुढे आले असता, आरोपीने त्यांना तसेच साक्षीदार शशिकांत शिंदे यांना देखील दगड फेकून मारले. शिवीगाळ करत दमदाटी केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत फिर्यादीसह इतर दोघांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page