
*मुंबई :* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन वाळू धोरणासह विविध विकास कामासंदर्भात ९ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. नवीन वाळू धोरणांतर्गत घरकुलांसाठी ५ ब्रास वाळू मोफत दिली जाणार आहे.
राज्यात ज्या ठिकाणी वाळू घाटांचे लिलाव झालेले नाहीत आणि ज्या ठिकाणी पर्यावरण विभागाची मंजूरी मिळाली आहे, त्या ठिकाणी घाट सुरू करण्याचा निर्णय हे नवीन वाळू धोरण मंजूर झाल्यानंतर घेतला जाईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याआधीच स्पष्ट केले होते. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्टोन क्रशरच्या माध्यमातून दगड बारीक करून ही वाळू तयार केली जाईल. या पर्यायी वाळूच्या उपलब्धतेमुळे पारंपरिक नदीतील वाळूची मागणी कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.
*मंत्रिमंडळ निर्णय संक्षिप्त…*
१) नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व पुणे या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतील शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करणार, यातून विकास कामांना वेग येणार (नगर विकास)
२ ) राज्याचे वाळू- रेती निर्गती धोरण- २०२५ जाहीर. (महसूल)
३) महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा निर्मुलन व पुनर्वसन) अधिनियम-१९७१ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय; झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मिळणार (गृहनिर्माण)
४) वांद्रे रिक्लेमेशन व आदर्श नगर (वरळी) या दोन म्हाडा अभिन्यासातील इमारतींचा C&DA मार्फत एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय (गृहनिर्माण)
५) सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्यासाठी धोरण विशेष अभय योजना-२०२५ (महसूल)
६) नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यात येणार (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन)
७) खासगी अनुदानित आयुर्वेद व खासगी अनुदानित युनानी संस्थांमधील गट-ब, क व ड संवर्गातील शासन मंजूर पदावरील शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी यांना पूर्वलक्षी प्रभावाने एक व दोन लाभांची ‘सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना’ लागू करण्याचा निर्णय (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये)
८) शासकीय आयुर्वेद/होमिओपॅथी/युनानी/योग व निसर्गोपचार महाविद्यालयांतील कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर भरावयाच्या अध्यापकांचे दरमहा एकत्रित ठोक मानधन निश्चित (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये)
९ ) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा (ग्रामविकास).