
मुंबई प्रतिनिधी – मुंबई -मागील काही वर्षापासून रखड़लेल्या मुंबई – गोवा महामार्गाच्या बांधकामाची त्रयस्त यंत्रणेमार्फत इन कॅमेरा चौकशी केली जाईल. यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कड़क कारवाई केली जाईल. मात्र आता हा महामार्ग कोणत्याही स्थितीत जानेवारी २०२६ पर्यन्त पूर्ण केला जाईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी विधानसभेत दिले.
गुहागरचे ठाकरे गट शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी मुंबई गोवा लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर मंत्र्यांनी उत्तर दिले, यावेळी महामार्गाबद्द्ल बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी सरकारचे वाभाडे काढले. विकासाच्या बाबतीत सरकारने कोकणाकडे नेहमी दुर्लक्ष केले आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. मात्र त्यात मुंबई-गोवा महामार्गाचा साधा उल्लेखही नाही. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रीन फिल्ड रस्त्याची घोषणा केली. मात्र ती हवेतच विरली. मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्याबाबत सरकारकडून प्रत्येक वेळी तारखा दिल्या गेल्या, डिसेंबर २०१२, १३, १४ आणि आज २०२५ साल उजाड़ले आहे अजून काम पूर्ण नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली.
भास्कर जाधव म्हणाले की, १६ ऑक्टोबर २०२३ ला चिपळूण येथील पुलावरील गर्डर कोसळला, यावेळी नशीब बलवत्तर म्हणून स्थानिक आमदार शेखर निकम बचावले. इंदापुर, माणगाव डायवर्सन अद्याप झाले नाही. परशुराम घाटाचे नेहमी बांधकाम केले जाते आणि ते कोसळते. वडखळ, नागोठणे, कोलाड़चा पुल अद्याप झाला नाही. शेकड़ो माणसे या महामार्गावरील अपघातात मृत्युमुखी पडली असल्याचे सांगत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी दर १५ दिवसानी व्हॅनेटी व्हॅन मधून या महामार्गवर पाहणी केली तरच हा महामार्ग पूर्ण होईल असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.
भाजपाचे आमदार प्रशांत बंब यावर बोलताना म्हणाले की या महामार्गाच्या बांधकामावर प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. मुख्य अभियंता, २ अधीक्षक अभियंता तसेच त्रयस्त यंत्रणे मार्फत याची चौकशी करा अशी मागणी केली. त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी बांधकाम विभागाची बाजू सावरत म्हणाले, मला व्हॅनेटी व्हॅनची गरज नाही. रस्ते पाहणी करण्याकरिता माझ्याकडे कार आहे. यातुन फिरण्याची ताकत माझ्याकडे आहे. परशुराम घाटाच्या संरक्षक भींती तेथील ठिसूळ माती असल्यामुळे कोसळतात. मात्र आता त्याची डिझाईन बदलले आहे. कोकणातल्या गणपती आणि शिमगा सण लक्षात घेता सर्विस रोड सुस्थितित ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. चिपळून पुल कोसळ्याप्रकरणी ठेकेदाराला ५० लाख तर डिझाईन तयार करणाऱ्या ला २० लाख दंड ठोठावला आहे. या महामार्गाच्या बांधकामावर केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांचे लक्ष असल्याचेही यावेळी सांगितले.
दरम्यान या मुंबई-गोवा महामार्गाच्या बांधकामाची त्रयस्त यंत्रणे मार्फत इन कॅमेरा चौकशी केली जाईल. जे कोणी दोषी असेल त्यांच्या वर कड़क कारवाई केली जाईल अशी ग्वाहीही यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.