संगमेश्वर /प्रतिनिधी: पैसाफंड हायस्कूलच्या कला विभागाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शाळेचे कला शिक्षक जितेंद्र दत्तात्रय पराडकर सर यांचा त्यांच्या मयूर बाग येथील निवासस्थानी जाऊन सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शिरगावकर आणि पत्रकार दिनेश आंब्रे (माजी विद्यार्थी) यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.
गेल्या २५ वर्षांत पराडकर सरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय यश संपादनासाठी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेक विद्यार्थ्यांनी कला क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे.
सत्कार सोहळ्यात जनार्दन शिरगावकर यांनी पराडकर सरांच्या समर्पित कार्याची स्तुती केली आणि त्यांच्या कलेतील योगदानाबद्दल आदर व्यक्त केला. दिनेश आंब्रे यांनीही आपले विद्यार्थी जीवनातील अनुभव सांगून सरांच्या मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित केले.
सन्मान स्विकारताना पराडकर सरांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेच्या व्यवस्थापन, सहकारी शिक्षक, आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीला दिले. त्यांनी सत्कारासाठी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.हा सन्मान सोहळा पराडकर सरांच्या कला साधनेसाठीच्या समर्पणाचा आणि त्यांचे योगदान साजरे करणारा ठरला.