पीएम सूर्यघर योजनेत मोठी संधी:छतावरील सौरऊर्जा प्रकल्पातून दरमहा 360 युनिट मोफत वीज, अनुदानासह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन…

Spread the love

पुणे- पुणे येथे रविवारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पीएम सूर्यघर योजनेच्या महावितरण सौर रथाचे उद्घाटन करण्यात आले. या योजनेंतर्गत घरगुती ग्राहकांना २५ वर्षे मोफत वीज मिळणार आहे. घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे दरमहा १२० ते ३६० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध होणार आहे.

योजनेअंतर्गत घरगुती वीजग्राहकांना मोठे अनुदान मिळत आहे. एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाते. गृहनिर्माण संस्था आणि घरसंकुलांसाठी विशेष तरतूद करण्यात आली असून, विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व सामाईक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट १८ हजार रुपये, अशा प्रकारे कमाल ९० लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे.

महावितरण आणि महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोशिएशन (मास्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय सौर रथाचे आयोजन करण्यात आले आहे. २३ जानेवारीपर्यंत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात फिरणाऱ्या या रथाद्वारे डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून वीजग्राहकांना योजनेची सविस्तर माहिती, फायदे आणि ऑनलाइन अर्ज करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले जात आहे.

कार्यक्रमात आमदार सिद्धार्थ शिरोळे, महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या हस्ते अनेक लाभार्थ्यांना अनुदान मंजुरीची प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page