संगमेश्वर :- तालुक्यातील मारळ गावात सह्याद्रीच्या शिखरात वसलेले मार्लेश्वर देवस्थान हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. मात्र या देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याची ठिकठिकाणी झालेली दुरवस्था भाविकांसाठी व प्रवाशांसाठी रोजची डोकेदुखी ठरत आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
सध्या या देवस्थानाला मकरसंक्रात उत्सवाचे वेध लागले आहेत. या तीर्थक्षेत्री मकरसंक्रात उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवातील मार्लेश्वर – गिरीजा देवीचा विवाह सोहळा (कल्याण विधी) पाहण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक या ठिकाणी गर्दी करत असतात. या कालावधीत दरवर्षी येथील रस्त्याचा प्रश्न नागरिकांना भेडसावतो. त्यामुळे याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. येथील मुरादपूर ते मार्लेश्वर रस्ता डांबरीकरण काम २०२३ रोजी पूर्ण झाले असून मारळ ते बोंड्ये दरम्यान मनिष मनोहर अणेराव यांच्या घरासमोरील काही भाग व मारळ ते मार्लेश्वर दरम्यान असलेल्या ओढ्यावरील भाग असे दोन भाग अद्याप कच्च्या स्वरूपाचे आहेत. तरी येणाऱ्या मार्लेश्वर यात्रेपूर्वी ही कामे पूर्ण करण्यात यावीत व तशा सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात याव्यात, अशी मागणी देखील येथील ग्रामपंचायतीच्यावतीने देवरुख सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.