देवरुख- संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमधील श्री गणेश वेद पाठशाळेच्या २७ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने “अथर्वशीर्ष: तत्त्व महत्त्व” या विषयावर पुणे स्थित प्रा. मुग्धा गरसोळे-कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले व यावेळी वेदपाठ शाळेतील विद्यार्थ्यांनी शांतीपाठ पठण केले. यानंतर वक्त्या प्रा. मुग्धा गरसोळे-कुलकर्णी यांच्या स्वागतानंतर व्याख्यानाला सुरुवात झाली.
प्रा. कुलकर्णी यांनी व्याख्यानचा आरंभ ‘गजानन गजानन’ या पदाने केला. यानंतर त्यांनी आपल्या मार्गदर्शनात अथर्वशीर्ष ही वेदवाणी असून, ज्ञानाची ओळख करून देणारे उच्चस्तरीय स्तोत्र.. तत्व असल्याचे नमूद केले. अथर्वशीर्षाची निर्मिती अथर्वण ऋषी आणि गणक ऋषींनी केली असल्याचे सांगून, हा मालामंत्र उत्तम समन्वय असणारे स्तोत्र असून त्यामध्ये उत्तम गेयता व नादमयता आहे.
अथर्वशीर्ष ही मनाची व्यायाम शाळा आहे, यातून उत्तम व्यक्ती वर्तनाचा संदेश मिळतो. अथर्वशीर्षामुळे मनाचा ताण तणाव कमी होतो, व्यक्तीचा अहंकार कमी होतो, मनाला शांत ठेवणारे व बुद्धीला स्थिर ठेवणारे ते महत्त्वाचे शास्त्र आहे. अथर्वशीर्षाचे दैनंदिन जीवनातील व सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाचे पैलू आणि अथर्वशीर्ष विषयक व्यापक दृष्टिकोन याप्रसंगी त्यांनी विशद केला. व्याख्यानाची सांगता त्यांनी गणेश स्त्रोत्राने केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, वक्त्यांचा परिचय आणि आभार प्रा. मंजुश्री भागवत यांनी मानले.