
माजी राज्यमंत्री रवींद्र माने, वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव व तहसीलदार अमृता साबळे यांच्याहस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन…

उद्घाटनानंतर दिवसभर रंगला स्पर्धांचा थरार…
*देवरुख-* संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था आयोजित १५ व्या तालुकास्तरीय दादासाहेब सरफरे आंतरशालेय कला-क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आज शुक्रवार दि.२० रोजी माजी राज्यमंत्री रवींद्र माने, वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव व तहसीलदार अमृता साबळे यांच्याहस्ते करण्यात आला.
हा महोत्सव दादासाहेब सरफरे विद्यालय शिवने येथे पार पडत आहे. विद्यार्थ्यांच्या कला-क्रीडा गुणांना वाव देण्याकरिता या महोत्सवाचे आयोजन गेली अनेक वर्ष करण्यात येत आहे. सकाळी जुन्या शाळेमधुन लेझीमच्या तालावर क्रीडा ज्योत आणण्यात आली. क्रीडा ध्वजारोहन, क्रीडा शपथ व दिपप्रज्वलन झाल्यावर स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, देवरुखच्या तहसीलदार अमृता साबळे, शिवणे सरपंच मारुती पवार, मुचरी सरपंच सुवर्णा जाधव, अध्यक्षस्थानी बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राजाराम गर्दे, उपाध्यक्ष शांताराम भुरवणे, सचिव शरद बाईत, संचालक सचिन मोहिते, दिनेश जाधव, ललित लोटणकर, शांताराम जाधव, घडघडी शिक्षण संस्था सोनवडेचे अध्यक्ष प्रभाकर सनगरे, दादासाहेब सरफरे विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश विरकर, पर्यवेक्षक महावीर साठे, याबरोबरच पंच, ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
यावेळी प्रस्तावनेत संस्था उपाध्यक्ष शांताराम भुरवणेंनी महोत्सवाचे फलित विशद केले. तहसिलदार अमृता साबळे म्हणाल्या कि, विद्यार्थ्यांनी अभ्यासा बरोबरच विविध स्पर्धांकडे लक्ष दिले पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेता येईल अशी कामगिरी करा असा सल्ला देतानाच खेळामुळे फिटनेस चांगला राहतो त्यामुळे खेळ देखील महत्वाचा असल्याचे सांगितले. जि. प. चे माजी अध्यक्ष रोहन बने म्हणाले कि, खेळताना हारजीत होते. मात्र खिलाडू वृत्ती महत्वाची आणि संयम देखील. या संस्थेकडुन गेली अनेक वर्षे शिस्तबद्ध असा कार्यक्रम राबविला जातो.

त्यामुळे तालुक्यातील अनेक खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध होत आहे. वाशिष्टी दुग्ध प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव म्हणाले कि, संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना व्यासपीठ देणारा हा महोत्सव आहे. याप्रमाणे तालुक्यात क्रीडा अकॅडमी तयार व्हावी त्याकरिता लागेल ते सहकार्य आपण करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महोत्सवाचे उद्घाटक माजी राज्यमंत्री रवींद्र माने म्हणाले या संस्थेकडून सातत्यपूर्ण आणि नियोजन बद्ध या क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यामुळे खेळाडू घडण्यास मदत होते. संस्थेने असेच दर्जेदार अविरत उपक्रम यापुढेही राबवावेत असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तसेच सिद्धेश तटकरे सारखे खेळाडु या लाल मातीतुन तयार व्हावेत असेही आवाहन केले.