मुंबई- एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद मोठी घोषणा केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरील आपला दावा सोडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील, तो मला आणि शिवसेनेला मान्य असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे म्हणाले, अडीच वर्षांत मी स्वत:ला कधीच मुख्यमंत्री समजलो नाही. मी स्वत:ला कॉमन मॅन समजून जनतेसाठी काम केले. महायुतीने सर्व घटकांसाठी काम केले. या अडीच वर्षांच्या काळात मला चांगले काम करता आले, याबद्दल मी आनंदी आहे.
शिवसेनेला मोदीजींचा निर्णय मान्य..
शिंदे म्हणाले, मी मोदीजी-शाहजींना फोन केला. तुम्ही जो निर्णय घ्याल, तो आम्हाला मान्य असेल, असे सांगितले. भाजपच्या बैठकीत तुमचा उमेदवार निवडला जाईल, तोही आम्हाला मान्य आहे. सरकार स्थापनेत आम्ही अडथळा ठरणार नाही. सरकार स्थापनेबाबत तुम्हाला जो निर्णय घ्यायचा असेल, तो घ्या. शिवसेना आणि माझी काही अडचण होणार नाही.
मला पदाची लालसा नाही
एकनाथ शिंदे म्हणाले, मला पदाची लालसा नाही. आम्ही भांडणारे लोक नाहीत. आम्ही काम करणारी माणसे आहोत. मी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनाही सांगितले आहे की, महाराष्ट्रात कोणताही स्पीड ब्रेकर नाही, कोणी नाराज नाही. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. महाविकास आघाडीमध्ये एक स्पीड ब्रेकर होता. तो काढून टाकण्यात आला आहे.
मी लोकप्रियतेसाठी काम केलेले नाही…
शिंदे म्हणाले- लोकांना वाटते की मुख्यमंत्री आपल्यातलाच आहेत. घर असो, मंत्रालय असो, लोक येतात, भेटतात. मी प्रत्येकाला भेटतो. मला जी ओळख मिळाली ती तुमच्यामुळेच. मी लोकप्रियतेसाठी काम केले नाही, महाराष्ट्रातील जनतेसाठी काम केले. अडीच वर्षे केंद्र सरकार पाठीशी उभे राहिले. राज्याला पुढे न्यायचे असेल, तर केंद्र सरकारचे सहकार्य अत्यंत गरजेचे आहे.
लाडका भाऊ अशी माझी ओळख झाली…
एकनाथ शिंदे म्हणाले- निवडणुका झाल्या आणि त्याचे निकाल आले, आमच्या कामामुळे ऐतिहासिक निकाल लागला. मी सर्वांचा लाडका भाऊ आहे. बहिणींनी मला लक्षात ठेवले आणि माझे रक्षण केले. मला सगळं माहीत आहे. कोणाला राग आला, किंवा कोण कुठे गेला, याबाबत विचारू नका. हा एवढा मोठा विजय ऐतिहासिक आहे. आम्ही एकत्र काम करणारे लोक आहोत, आम्ही खूप मेहनत घेतली. आम्ही जे काही काम केले, ते मनापासून केले. माझे काम महाराष्ट्रातील जनतेसाठी असेल.
मागील सरकारमध्ये राज्य मागे पडले, ते आम्ही पुढे आणले
एकनाथ शिंदे म्हणाले- राज्याच्या प्रगतीचा स्तर आम्ही वाढवला. यावेळीही राज्याच्या विकासाचा वेग वेगवान आहे. मोदीजी, शाहजींनी खूप साथ दिली. इतके निर्णय कोणत्याही सरकारने घेतलेले नाहीत. आम्ही जनतेसाठी 124 निर्णय घेतले. मागील सरकारच्या काळात राज्य मागे पडले होते ते आम्ही पुन्हा पुढे आणले आहे.
मला जबाबदारी दिली, मी काम केले
एकनाथ शिंदे म्हणाले, कुटुंबातील प्रत्येक सदस्याला काहीतरी देण्याचा प्रयत्न केला. सरकारचे काम लोकांसाठी काहीतरी करणे आहे. प्रत्येक घटकाला आम्ही काही ना काही दिले. अमित शहा यांचा मला भक्कम पाठिंबा होता. ते माझ्या मागे कायम उभे राहिले. तुम्ही जनतेसाठी काम करा, आम्ही तुमच्यासोबत असल्याचे शहा यांनी मला सांगितले. त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला. मला मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. मी प्रत्येक क्षणी जनतेसाठी काम केले.
सर्व प्रश्नांची उत्तर आज कदाचीत मुख्यमंत्री देतील…
एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषद घेण्यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली याचा अर्थ त्यामध्ये निश्चित काहीतरी बातमी असणार आहे. मुख्यमंत्री कोण होणार? उपमुख्यमंत्री कोण होणार? केंद्रातून ऑफर कोणाला आली? या सर्व प्रश्नांची उत्तर आज कदाचीत मुख्यमंत्री देतील. एकनाथ शिंदे यांच्या मनात नेमके काय चालले आहे, हे निश्चितपणे सांगता येत नाही. पण मुख्यमंत्री जेव्हा त्यांच्या दाढीवरून हात फिरवतात, त्यावेळी निश्चित काही तरी घडते, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.
4 दिवसांपासून मुंबईपासून दिल्लीपर्यंत बैठकांचे सत्र…
महाराष्ट्रात कुणाच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन होणार? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. भाजपला एकट्याला बहुमताच्या आसपास जागा मिळाल्यात. विशेषतः अजित पवार यांनीही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. त्यानंतरही महायुतीने आपला नवा कारभारी घोषित केला नाही. सूत्रांच्या मते, भाजप नेतृत्वाला जातीय समीकरणापासून एनडीएच्या सर्वच सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचा आहे. यामुळेच गत 4 दिवसांपासून मुंबईपासून दिल्लीपर्यंत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.
एकनाथ शिंदे सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री…
288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेत भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या. तर शिवसेनेला 57 व राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. भाजपने या निवडणुकीत आपले 149 उमेदवार दिले होते. तर शिवसेनेने 81 व राष्ट्रवादीने 59 जणांना तिकीट दिले होते. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपुष्टात आला आहे. एकनाथ शिंदे यांनीही राजीनामा दिला आहे. आता ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा राज्यशकट हाकतील.