कॉंग्रेसचे प्रभारी मनिष राउत यांची पत्रकार परिषदेत माहिती , राजन साळवी हेच महाविकास आघाडीचे उमेदवार
राजापूर / प्रतिनिधी – कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार अविनाश लाड यांच्या समवेत असलेले काँग्रेसचे राजापूर तालुका अध्यक्ष किशोर नारकर यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल असे काँग्रेसचे प्रभारी आणि जिल्हा समन्वयक मनिष राउत यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. राजापूरातील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते .
राजापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्यावर पक्षाने कारवाई केलीआहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष त्यांच्या समवेत असण्याचा प्रश्नच येत नाही. काँग्रेस महाविकास आघाडी समवेत असून आमचे उमेदवार राजन साळवी यांना चांगला प्रतिसाद मिळत असून ते मोठ्या मताधिक्याने विजय होतील असा विश्वास काँग्रेसचे प्रभारी मनीष राऊत त्यांच्यासह पक्षाचे समन्वयक माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर, माजी विधानसभा सदस्या ऍड हुस्नबानू खलिफे आणि ज्येष्ठ नेते सहदेव बेटकर यांनी राजापुरात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
राजापूर लांजा साखरपा या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस, शिवसेना ठाकरे पक्ष, आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष यांची महाविकास आघाडी असून या मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार असल्याने तो जागा वाटपात त्या पक्षाला सोडण्यात आला. तरीदेखील काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून आपला अर्ज भरला. त्यानंतर काँग्रेसने अविनाश लाड यांच्यावर कारवाई करताना त्यांना सहा वर्षासाठी बडतर्फ केले आहे. त्यामुळे अविनाश लाड यांच्याशी काँग्रेसचा कोणताही संबंध नाही. तरी देखील त्यांच्याकडून संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. मात्र काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विचलित न होता महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांचा प्रचार करावा असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले.
राजापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडी समवेत असून आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांच्या प्रचार कार्यात काँग्रेस पक्ष उतरलेला आहे. या मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना भरभरून प्रतिसाद मिळत असून ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा जोरदार विश्वास काँग्रेसचे प्रभारी आणि जिल्हा समन्वयक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. अविनाश लाड यांच्यासमवेत असलेले काँग्रेसचे तालुका अध्यक्ष किशोर नारकर यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असे पक्ष प्रभारी मनीष राऊत यांनी स्पष्ट केले.