रत्नागिरी : तुम्ही शासनामधील कुटुंब आहात, चळवळ निर्माण करुन प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना घराघरात पोहचवा. सरकार तुम्हाला ताकद देतेय. सीएमईजीपी, पीएमईजीपी, लखपती दिदी योजनांचा फायदा करुन घ्या, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
येथील स्वयंवर मंगल कार्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये कार्यरत रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यातील समुदाय संसाधन व्यक्तींना मोफत अँड्राॕईड मोबाईलचे वितरण आज करण्यात आले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, गटविकास अधिकारी जे पी जाधव आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.सामंत म्हणाले, सीआरपींना मोबाईल देण्याचा मी शब्द दिला होता. त्याचे वितरण आज पार पडतंय. त्याचा मला मनापासून आनंद होत आहे. स्वत:च्या मोबाईलमधून महिला बचत गटांसाठी महिलांना काम करता येणार आहे. कोणाच्याही मोबाईलवर आता महिला भगिनिंना अवलंबून राहण्याची गरज नाही. ५ मतदार संघात प्रभाग संघांसाठी २५ कार्यालयं देण्यात आली आहेत. ऊर्वरित कार्यालय पुढील डिसेंबरमध्ये मिळणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत ग्रामीण भागातील महिलांना मिळालेले पंधराशे रुपये हे पंधरा लाखांसारखे आहेत.
सप्टेंबरमध्येही अर्ज भरला तरीही ३ महिन्यांचे पैसे त्या महिलेला मिळणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यासाठी वर्षाला ४६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्याच्या विकासात महिलांचा सिंहाचा वाटा असणार आहे. कारण ४६ हजार कोटींचा व्यवहार राज्यात चालणार आहे. हे पैसे व्यापारात फिरणार आहेत. व्यापाराची उन्नती होणार आहे. टॅक्सच्या स्वरुपात सरकारलाही पैसे मिळणार आहेत.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत १ ते ३ लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. त्याचबरोबर प्रशिक्षणासाठीही पैसे मिळणार आहेत. या योजनेचे राज्यात २ लाखजणांना लाभ देण्यात आला आहे. त्यामध्ये ६१ टक्के महिला आहेत. ही योजना चळवळ निर्माण करुन घराघरात पोहचली पाहिजे. सीआरपींनी महिला बचत गटाच्या माध्यमातून ताकद निर्माण करावी. महिला ५० लाखांचे कर्ज घेत आहेत,असे बँकांच्या मॅनेजरने अभिमानाने सांगितले पाहिजे. लखपदी दिदी या केंद्राच्या योजनेचे ५४ हजार जिल्ह्यासाठी उद्दिष्ट आहे. यातील ३ लखपती दिदींनी प्रधानमंत्र्यांशी जळगाव येथे थेट संवाद साधला आहे. या योजनेचाही महिलांनी लाभ घ्यावा, असे पालकमंत्री म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातील राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे आणि क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तसेच दीपप्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यातील बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.