पुणे- राज्यातील काही भागात आज देखील अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज काही जिल्ह्यात यलो तर काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात पावसाचा जोर कायम असून रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गला पावसाचा ऑरेंज अलर्ट तर पुणे व सातारा जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट तर काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यात गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांचा समावेश आहे.
आज समुद्रसपाटीवर असलेल्या कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टी पर्यंत सक्रिय आहे. आज बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात आणि पश्चिम बंगाल आणि बांगलादेश लगतच्या किनारी भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील पाच ते सात दिवस तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात आज बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील पाच ते सहा दिवस मध्य महाराष्ट्रात दोन ते तीन दिवस मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भात ३० आणि ३१ जुलै व १ ऑगस्टला बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज साताऱ्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुण्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी खूप जोरदार तसेच मेघगर्जने गर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. २८ ते ३० जुलै रोजी विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटा सहित पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भात तीन दिवस यलो अलर्ट दिला आहे.