
विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीनं आज शिव-शाहू सद्भावना यात्रा काढून, सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केला.
कोल्हापूर – छत्रपती शिव-शाहूंच्या पुरोगामी आणि सर्वधर्मसमभाव भूमीत सामाजिक शांततेसाठी दुसऱ्यांदा सद्भावना यात्रा काढावी लागते, हे या महायुती सरकारचं सपशेल अपयश आहे, याचा जाहिर निषेध करत, चार दिवसांपूर्वी विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीनं आज शिव-शाहू सद्भावना यात्रा काढून, सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केला, राजर्षी शाहूंनी दिलेला समतेचा वारसा यापुढंही जपू असा निर्धार यावेळी करण्यात आला.
खासदारांच्या नेतृत्वाखाली यात्रा :
रविवारी ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. अतिक्रमणाशी संबंध नसलेल्या गजापूर आणि मुसलमानवाडीत समाजकंटकांनी दगडफेक व जाळपोळ करुन, अनेक घरे, वाहने, प्रार्थनास्थळांची मोडतोड केली. त्यामुळं जिल्ह्यात तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या वतीनं सामाजिक सद्भावना यात्रा काढण्यात आली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळापासून या यात्रेस सुरुवात झाली. तर ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन, राष्ट्रगीतानं याची सांगता करण्यात आली.
दंगल थांबवता आली असती :
दीड वर्षात दोनदा कोल्हापुरात सद्भावना दौड काढण्याची वेळ आली ही, यायला नको होती. राजर्षी शाहू महाराजांनी दिलेलं समतेचं वातावरण कोणीतरी मुद्दामून गढूळ करण्याचा प्रयत्न सुरु आहे. नुकसानग्रस्तांना केलेली मदत ही मनापासून आहे, आम्हाला मदत करावी वाटली म्हणून आम्ही केली. ही दंगल निश्चित थांबवता आली असती त्यात काही प्रश्नच नाही, ती थांबवली नाही म्हणून हे घडल्याचं खासदार शाहू महाराज म्हणाले. तसंच राज घराण्यात दोन भूमिका आहेत का, या प्रश्नाला उत्तर देताना खासदार शाहू महाराज म्हणाले दोन व्यक्तींच्या दोन भूमिका असू शकतात, माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे, असंही शाहू महाराज म्हणाले.