संगमेश्वर -( मकरंद सुर्वे संगमेश्वर) : संगमेश्वर तालुक्यात मान्सून पूर्व पावसाने झोडपले असून वादळी वाऱ्यासह पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान होत आहे. रात्रीच्या दरम्याने आलेल्या पावसाने शिवधामापूर, मानसकोंड, माभळे आदी गावांना वादळाचा मोठा फटका बसला आहे. माभळे घडशीवाडी येथील नितीन देवजी घडशी यांच्या घरावर झाड पडल्याने मोठे नुकसान झालेले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सरपंच मनोहर जाधव आणि तलाठी घाग यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
संगमेश्वर तालुक्याला मान्सून पूर्व पावसाने झोडपले असून वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे मानस कोंड येथे खड्ड्यामध्ये तीन ते चार फूट पाणी साचल्याने अनेक गाड्या अडकून पडल्या होत्या रात्रीच्या दरम्याने या गाड्या अडकून पडल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या अडकलेल्या गाड्या बाहेर काढण्यासाठी अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. कोणतेही दक्षता न घेता सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे महामार्गावरून धावणाऱ्या गाड्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे गाड्या चिखलामध्ये बंद पडत असल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागत आहे मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली असली तरी चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदार कंपनीने कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न केल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.