
राजापूरच्या प्रचार सभेत सावंतवाडीचा दीपेश चमकला , स्वतःचे शरीर रंगवून केले भाजपमय !
राजापूर / प्रतिनिधी –
आज राजापूर येथे होत असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभेत सावंतवाडी येथील दीपेश शिंदे या युवकाने स्वतःचे शरीर रंगवून भाजपमय केले आहे. त्याचा हा लूक भर प्रचारसभेत चर्चेचा विषय ठरतोय. युवा उद्योजक तथा भाजपचे युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस विशाल परब यांच्या सौजन्याने स्वतःचे शरीर दीपेश याने रंगवून घेतले आहे . एकीकडे उन्हाळ्याने तापमान वाढत असताना दुसरीकडे मात्र निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. याच निमित्ताने प्रचारसभांना उत येत आहे.
महायुतीचे लोकसभा सिंधुदुर्ग – रत्नागिरी मतदारसंघाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ आज रत्नागिरीत धडाडत आहे . त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी राजापूर येथील सभेस उपस्थित आहेत. या सभेत दीपेश याने स्वतःच्या शरीरावर कमळ रेखाटून भाजपच्या चिन्हाचा प्रचार करीत नारायण राणेंना दिल्लीचे तख्त भेदण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.