महायुतीला मोदीसाहेबांचे जगातील पॉवरफुल इंजिन देवेंद्र फडणीस यांचा आघाडीवर हल्लाबोल …पेण मध्ये महायुतीचा विराट मेळावा …

Spread the love

या विकासाच्या गाडीमध्ये सगळ्यांना बसवून ‘सबका साथ… सबका विकास’… करत ही गाडी पुढे जातेय – देवेंद्र फडणवीस…

पेण : आपल्या महायुतीला मोदीसाहेबांचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन आहे. या इंजिनाला आपल्या वेगवेगळ्या अनेक घटक पक्षांचे डब्बे लागले आहेत. अशा डब्यांमध्ये दीन-दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, भटके विमुक्त, सगळ्यांना बसण्याची जागा आहे. ही विकासाची गाडी आहे. त्या गाडीमध्ये सगळ्यांना बसवून ‘सबका साथ… सबका विकास’… करत ही गाडी पुढे जाते आहे, असे स्पष्ट करतानाच तुम्ही सुनिल तटकरेंच्या घड्याळाचे बटन दाबताक्षणी रायगडची बोगीदेखील आमच्या मोदीसाहेबांसोबत लागते आणि रायगडच्या जनतेला विकासाकडे घेऊन जाते असे उद्गार भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पेण येथील विराट सभेत काढले.

या निवडणुकीत केवळ दोनच पर्याय : एकीकडे महायुती आहे तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात २६ पक्षांची खिचडी…

ही निवडणूक ग्रामपंचायतींची… जिल्हा परिषदेची… नगरपंचायतीची… महानगरपालिकेची… विधानसभेची नाही… तर देशाच्या लोकसभेची आहे… देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे… कोणाच्या हातात देश सुरक्षित राहिल… कोण देशाला विकासाकडे नेऊ शकेल… कोण आमच्या येत्या पिढ्यांचे भाग्य आणि भवितव्य बदलू शकेल, याचा फैसला करणारी निवडणूक आहे… आणि या निवडणुकीत केवळ दोनच पर्याय आपल्यासमोर दिसत आहेत… पहिला पर्याय आहे विश्वगौरव… विकासपुरुष नरेंद्र मोदी आणि मोदींजींच्या नेतृत्वामध्ये आपली महायुती एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी असेल आता मनसेही सोबत आहे. रिपाईसुध्दा आहे, अशी भव्य महायुती आहे आणि दुसरीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात २६ पक्षांची खिचडी आहे. असे दोन पर्याय आपल्यासमोर आहेत असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दुसरीकडे काय अवस्था आहे. तिथे डब्बेच नाहीत. प्रत्येकजण सांगतोय मीच इंजिन आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन… पवारसाहेब म्हणतात मी इंजिन, उध्दव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे… मात्र आपल्याकडे बसायला ट्रेन आहे आणि बसायला जागाही आहे. परंतु इंजिनमध्ये किती लोकांना बसायला जागा असते. इंजिनमध्ये केवळ ड्रायव्हर बसू शकतो. सामान्य माणूस इंजिनमध्ये बसू शकत नाही आणि त्यांचे इंजिन कसे आहे. राहुल गांधी यांच्या इंजिनमध्ये फक्त सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांना जागा आहे तर शरद पवारांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळेच बसू शकतात आणि उध्दव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरेच बसू शकतात. इतर कुणालाही त्यांच्या इंजिनमध्ये बसायची जागा नाही… यांचे इंजिन कसे आहे तर राहुल गांधी दिल्लीकडे ओढतात… शरद पवार बारामतीकडे ओढतात आणि उध्दव ठाकरे मुंबईकडे ओढतात… त्यामुळे यांचे इंजिन जागेवरून हालतही नाही डुलतही नाही फक्त ठप्प पडलेले आहे. त्यामुळे एकच पर्याय आहे तो म्हणजे नरेंद्र मोदींचा… ज्यांनी या देशाला विकासाकडे नेले आहे असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दहा वर्षांत देशातील २५ कोटी लोक हे गरीबी रेषेच्या वर आले…

या देशात मोदींनी काय किमया केलीय तर दहा वर्षांत देशातील २५ कोटी लोकं हे गरीबी रेषेच्या वर आले. दहा वर्षात २० कोटी लोकं जे झोपडीत रहायचे त्यांना पक्के घर मिळाले. देशामध्ये ५० कोटी घरांमध्ये मोदींनी गॅस पोहोचवला. ५५ कोटी लोकांना शौचालयाची व्यवस्था केली. ६० कोटी लोकांच्या घरी पिण्याचे शुद्ध पाणी पोहोचवले. ५५ कोटी लोकांना ५ लाखांपर्यंत उपचार आयुष्यमान भारत माध्यमातून मोफत दिला. ६० कोटी तरुणांना मुद्राचे दहा लाखापर्यंत कर्ज विनातारण दिले. यात ३१ कोटी महिला आहेत की ज्या आज आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. ८० लाख बचत गटांना ८ लाख कोटी रुपये दिले आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभे केले.

महिलांना अधिकार देण्याचे काम मोदींनी केले..

मोदी म्हणतात एक पुरुष पायावर उभा राहिला तर केवळ पुरुष उभा रहातो पण महिला पायावर उभ्या राहिल्या तर संपूर्ण कुटुंब पायावर उभे राहते. आता बचत गटांच्या महिलांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, सरकारी जागा परिसरात विक्री केंद्र उभी करायला सांगितले आहे आणि आता २०२६ नंतर विधानसभेतही आणि लोकसभेतही महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे महिलांना अधिकार देण्याचे काम मोदींनी केले आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणली जाणार..

वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी आणण्यात आल्या आहेत. सगळे प्रश्न सोडवत आहोत, काळजी करू नका. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला जाणार आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान पुन्हा झाले तर अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणली जाणार आहे. देशात आणि राज्यात रस्त्यांचे जाळे निर्माण होत आहेत. मोदींनी या देशातील भ्रष्टाचार संपवला आणि जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोहोचवला आहे. कोरोना काळात या देशातील जनतेला लस तयार करून जिवंत ठेवण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

त्यावेळी अनंत गीते यांना गुदगुल्या होत होत्या.

अनंत गीते आमची मते घेऊन निवडून येत होते त्यावेळी त्यांना गुदगुल्या होत होत्या आणि आज आमच्यावर टिका करत आहेत. पण लक्षात ठेवा अनंत गीते, याठिकाणी खरी शिवसेना आमच्यासोबत आहे. हिंदूहदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे एकनाथ शिंदे आमच्यासोबत आहेत. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडला त्यांच्यासोबत जनता कधीही जाणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

अख्खा पेण सुनिल तटकरे यांच्या पाठीशी असेल. तटकरेंना चिंता करण्याचे कारण नाही. पुढील पाच वर्षे मोदींच्या हाती सत्ता देणार आहोत. त्यामुळे सुनिल तटकरे यांची निशाणी घड्याळ असून त्यावरील बटन दाबणार तेव्हा ते थेट मत मोदींना मिळणार आहे, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page