भुवनेश्वर- ओडिशातील झारसुगुडा येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. ओडीशातील महानदीत ५० प्रवाशांसह एक बोट उलटली आहे. या बोटीत लहान मुले आणि महिला असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर ७ ते ८ जण बेपत्ता झाले आहेत. अनेकांना वाचवण्यात बचावपथकाला यश आले आहे.
ओडिशातील या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरु केले. बचाव पथकाने अनेकांचे प्राण वाचवले आहे. बचावकार्य अजूनही सुरु आहे. या दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी चार लाखांची मदत जाहीर केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, डीजी फायर सुधांशू सारंगी यांनी सांगितले की, बचावकार्य सुरु आहे. आमच्या स्कूबा ड्रायव्हर्स आहेत. आम्ही त्यांना बाकीच्या लोकांचा शोधा घेण्यासाठी पाण्याखाली पाठवले आहे. बचावकार्यासाठी भूवनेश्वर येथून एक टीम झारसुगुडा येथे पाठवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झागसुगुडाच्या लखनपूर ब्लॉक अंतर्गत शारदाजवळा महानदीमध्ये ही घटना घडली आहे. एक बोट नदीतून लहान मुले आणि महिलांना घेऊन जात होती. तेव्हाच ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेत ७ जणांचा मृत्यू तर ७ ते ८ जण बेपत्ता आहेत. ही दुर्घटना घडली तेव्हा काही मच्छीमार तिथे उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, बोट बरगढ जिल्ह्यातील बांधीपाली भागातून प्रवाशांना घेऊन जात होती. बोट उलटली तेव्हा स्थानिक मच्छीमारांनी अनेकांचे प्राण वाचवले आहेत. बचाव पथक बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे. मात्र, महानदीच्या जोरदार लाटांमुळे बचावकार्यात अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे.