महाराष्ट्रात कुठे ही रसवंती गृहात ऊसाचा रस पिण्यासाठी थांबल्यावर तुम्हाला असा प्रश्न कधी पडलाय का…? की या बहुतांश रसवंती गृहांची नावे ‘ नवनाथ किंवा कानिफनाथ ‘ का असतात…?

Spread the love

▪️आता उन्हाळा चांगलाच जाणवू लागलाय… अमृततुल्यवर होणाऱ्या चाय पे चर्चावाल्या गरम चर्चाचे फड नवनाथ रसवंती गृहावर बसू लागले आहेत. ऊसपट्ट्यातलं कोल्हापूर, जयसिंगपूर, सांगली असो की दुष्काळात रमलेल नांदेड लातूर, देशाची आर्थिक राजधानी मुंबई असो की आडमार्गावरचं जांभूळगाव. प्रत्येक गावातल्या स्टँडवर आठवडी बाजाराच्या ठिकाणी नवनाथ रसवंतीगृह असतेच, कधी कधी कानिफनाथ रसवंतीगृह असं नाव असतं.

▪️स्वच्छ टापटीप हे या रसवंतीगृहाचं वैशिष्ट्य असते. आत मध्ये नवनाथांचे चित्र लावलेले असते. टिपिकल पांढरी टोपी विजारशर्ट घातलेले काका ऊसाचा रस काढत असतात. घुंगराच्या मधुर सुरातल्या छुमछुम अशा लयीत मशीनचा गोल फिरणारा चरखा, त्यातून आतबाहेर फिरणारा ऊस आणि मग चिपाड बाजूला जाऊन आपल्या हातात येतो मस्त आलं लिंबू टाकलेला थंड उसाचा रस. समोर ठळक अक्षरात लिहिलेलं असत,

“देशबंधूनो विचार करा चहा पेक्षा रस बरा”

▪️चांद्या पासून बांद्यापर्यंत कुठेही जा. पूर्ण महाराष्ट्रभर रसवंतीगृहामध्ये फार पूर्वीपासून हेच चित्र आपल्याला पाहायला मिळतं.
घामाने डबडबलेले थकले भागले कष्टकरी असो वा एसी कारमधून फिरणारे मोठया कंपनीचे सीइओ अशा सगळ्यांची क्षुधाशांती या उसाच्या रसानेच होते.

▪️पण ही एकाच नावाची नवनाथ रसवंतीगृह पाहिल्यावर आताच्या पिढीतल्या कुणाला वाटतं की….. ही सगळी रसवंतीगृह एकाच माणसाच्या मालकीची आहेत की काय…??? तर कुणाला वाटत की मॅकडोनाल्ड, के एफ सी चे जसे फ्रँचाइजी देतात तसे नवनाथ रसवंती गृहाची देखील फ्रँचाइजी असते की काय…???

🔹️नवनाथ रसवंती गृहामागची कथा…

▪️तर गोष्ट आहे साधारण सत्तर ऐंशी वर्षा पूर्वीची. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका गाव बोपगाव. पश्चिम महाराष्ट्राच्या मानान दुष्काळी पट्टा. पण इथला शेतकरी जिद्दी. जवळ असणाऱ्या थोड्याथोडक्या पाण्यावर शेती जगवत होता. त्याकाळात साखर कारखान्यांच पेव फुटलेलं नव्हत. त्यामुळे शेतात पिकणाऱ्या उसाला हक्काचं मार्केट नव्हत. त्यातून मिळणारा रोजगार नव्हता.

▪️अशातच गावातला कोणीतरी खटपट्या तरुण रोजगार शोधायला मुंबईला गेला. तिथ गेल्यावर त्याला कळाल की इथ आपल्या उसाला इथ भरपूर मागणी आहे. त्याकाळात देशी उस असायचे. लहानमुलाला देखील एका फटक्यात शेंड्यापासून बुडख्यापर्यंत सोलता येईल असा तो ऊस असायचा. या उसाचे छोटे छोटे तुकडे करून बरणीत घालून ते मुंबईला विकले जाऊ लागले. नंतर कोणाच्यातरी लक्षात आलं असं दारोदारी फिरण्यापेक्षा एका जागी दुकान टाकून तिथ हे रस काढून विकावं. पुरंदरच्या गोड उसाच्या रसाने मुंबईत जादू केली. हळूहळू बोपगाव, सासवड, चांबळी, बिव्हरी अशा गावातली बंडी विजार घालणारे शेतकरी रसवंतीच्या बिझनेससाठी पूर्ण राज्यभरात पसरले. जिथ जातील तिथ दुधात साखर विरघळावी तसे तिथल्या माणसांच्यात विरघळून गेले. धंद्यात सचोटी ठेवली. आपल्या रसवंतीला त्यांनी ब्रँड बनवलं.

🔹️मग रसवंतीला नवनाथ हेच नाव का दिल गेल..???

▪️तर बोपगावजवळच्या डोंगरावरच्या गुहेत नाथसंप्रदायाचे नऊ नाथांपैकी एक कानिफनाथस्वामी येथे तपश्चर्येला बसले होते. आजही त्या जागेवर सुंदर मंदिर आहे. अख्खा पुरंदरतालुका या कानिफनाथांचा भक्त आहे. इथली माणस जगभर पसरली पण आपल्या मातीला विसरली नाहीत. त्यांनी आपल्या रसवंतीगृहाचे नाव श्रद्धेनं कुणी नवनाथ तर कुणी काफ़िनाथ ठेवलं.

▪️“ताजा ऊस हा हत्तीला फार आवडतो आणि कानिफनाथांची उत्पत्ती ही हत्तीच्या कानातून झाली आहे ! अशी लोककथा आहे.. त्यामुळे भाव तिथे देव या न्यायाने कनिफनाथाना ऊस , रस , गूळ आवडतो ! इतका सिंपल अर्थ आहे ! दत्तसंप्रदायाची नाथसंप्रदाय ही शाखा आहे ,त्यामुळे नवनाथ रसवंती , कानिफनाथ रसवंती ही नावे ठेवण्याचा प्रघात पडला आणि तो जनमानसात रुळला

▪️कानिफनाथ गड बोपगाव
पूर्वी बैलानी फिरवल्या जाणाऱ्या लाकडी घाण्यावर हे रस काढलं जायचं. पुढे लोखंडी मशीन आले. बैल गेले. पण या बैलानी आपल्याला एकेकाळी जगवलेलं याची आठवण या शेतकऱ्याच्या पोरांनी विसरू दिली नाही. त्यामुळेच बैलाच्या गळ्यातल घुंगरू आजही रस काढणाऱ्या मशीन चरख्यावर छुमछुम आवाज करत आहे. नवनाथ / कानिफनाथ रसवंतीगृहाचं यश बघून इतर रसवंतीगृह वाले सुद्धा तेच नाव वापरू लागले.

▪️कोक पेप्सी सारखे कित्येक कोल्ड्रिंक आले तरी उसाचं रसासारख्या पारंपारिक पेयाची लोकप्रियता कमी होत नाही. कावीळ सारख्या रोगावर हमखास गुणकारी कोणत्याही सिझन मध्ये चालणारा आरोग्यदायी उत्साहवर्धक विशेष म्हणजे खिशाला परवडणारा उसाचा रस प्यावाच आणि तो ही नवनाथ रसवंतीगृहाचा हेच गोड सत्य उरते…

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page