रत्नागिरी- भारतीय जनता पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे किरण सामंत यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, भाजप आणि शिवसेना यांच्यातील तिढा आता सुटला असून किरण सामंत यांनी माघार घेतला असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. त्यानंतर लगेचच भारतीय जनता पक्षाच्या वतीने नारायण राणे यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे महायुतीमधील हा कोकणातील तिढा सामांजस्याने सुटला असे म्हणावे लागेल.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची तयारी सुरू केली होती. तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी देखील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघावर आपला दावा सांगितला होता. महायुतीच्या जागा वाटपामध्ये यामुळे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत तिढा निर्माण झाला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर किरण सामंत यांनी सामंजस्याची भूमिका घेत माघार घेतली असल्याची माहिती उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
नारायण राणे यांचा प्रचार करणार – सामंत…
महायुतीमध्ये आमच्यामध्ये कोणतीही नाराजी नाही. आम्ही ज्या उमेदवाराला भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी देईल, त्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. मग तो उमेदवार नारायण राणे असेल तरीदेखील आम्ही त्यांचा प्रचार करू, असे देखील उदय सामंत यांनी म्हटले होते. त्यानंतर लगेचच भारतीय जनता पक्षाच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली.
विनायक राऊत यांच्या विरोधात नारायण राणे अशी लढत…
कोकणातील महत्त्वाचा मानला जाणारा रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघात सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विनायक राऊत हे विद्यमान खासदार आहेत. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विनायक राऊत यांनीही आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र महायुतीचा उमेदवार अद्याप घोषित झाला नव्हता. अखेर भारतीय जनता पक्षाने विनायक राऊत यांच्या विरोधात नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये दिसून येणार आहे.
2019 मध्ये नीलेश राणे यांचा पराभव…
रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत विरुद्ध नीलेश नारायण राणे असा सामना झाला होता. या निवडणुकीत विनायक राऊत यांनी नीलेश राणे यांचा सुमारे पावने दोन लाख मतांनी पराभव केला होता. यावेळी या लोकसभा मतदारसंघांमध्ये तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच 7 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर पुन्हा एकदा राणे विरुद्ध राऊत अशी लढत होणार आहे. मात्र, यावेळी नीलेश राणे यांच्या ऐवजी नारायण राणे यांच्यासोबत थेट लढत विनायक राऊत यांना द्यावी लागणार आहे. त्यामुळे आता या निवडणुकीची रंगत आणखीनच वाढली आहे.