रमजान हा इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र महिना आहे. या महिन्यात मुस्लिम बांधवांकडून रोजा ठेवला जातो. त्यानंतर याच महिन्यात ईद साजरी केली जाते. साधारणपणे चंद्र दिसल्यावर रमजान सुरू होतो आणि दुसऱ्या दिवसापासून रोजा ठेवण्यास सुरुवात होते. तसेच ईद सुद्धा चंद्र दिसल्यावरच साजरी केली जाते. या वर्षी ईद 10 एप्रिल रोजी येणार की 11 एप्रिल रोजी येणार याबाबतचा संभ्रम आहे.
मुंबई- इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र महिना संपण्याला अजून काही दिवस बाकी आहेत. कारण काही दिवसात ईद उल फितरच्या सणासह रमजान महिना संपणार आहे. इस्लाममध्ये रमजान आणि ईद उल फितर सर्वात पवित्र सण मानला जातो. याला मोठी ईदही म्हटलं जातं. इस्लाम मानणाऱ्यांसाठी हा महिना मुबारक आणि अव्वल असतो. तर ईद उल फितरच्या दिवशी लोक एकमेकांच्या गळाभेटी घेऊन एकमेकांना अमन आणि शांतीच्या शुभेच्छा देतात. यावेळी नमाज पठण करून सृष्टीच्या कल्याणाची कामना केली जाते. हा उत्सव अत्यंत धूमधडाक्यात साजरा केला जातो.
जर तुम्हाला ईद उल फितरच्या सणाच्या तारखेबाबत गोंधळ असेल तर आम्ही तुम्हाला योग्य माहिती देत आहोत. काहींना वाटतंय की हा सण 10 तारखेला आहे. तर काहींना 11 तारखेला ईद आहे असं वाटतंय. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. कोणत्या दिवशी ईद उल फितर साजरी करावी असा पेच काहींसमोर पडला आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार महिन्याभराच्या रमजान नंतर ईद उल फितरचा उत्सव येतो. ईद उल फितर आणि रमजान दोन्ही सणांची तारीख चंद्र पाहून ठरवली जाते. या वर्षाची रमजानचा चंद्र 11 मार्च रोजी दिसला होता. आणि त्याच दिवसापासून तरावीहची नमाज सुरू झाली होती. त्यानंतर 12 मार्च 2024 पासून रोजा ठेवण्यास सुरुवात झाली होती. म्हणजे रमजानचा महिना सुरू झाला होता.
▪️काय आहे मान्यता?
चंद्र दिसल्यानंतरच ईदची तारीख ठरवली जाते अशी इस्लाममध्ये मान्यता आहे. चंद्र दिसल्यानंतर दुसऱ्या दिवशी ईद साजरी केली जाते. पण सीमापलिकडील देशात ग्लोबल टायमिंगमुळे एक दिवस आधीच ईद साजरी केली जाते. म्हणूनच भारताच्या एक दिवस आधी अरब देशात रमजान, ईद उल फितर आणि ईद उल जुहा साजरी केली जाते.
▪️ईद कधी साजरी करणार?
यंदा 2024मध्ये ईद उल फितरची तारीख चंद्र दिसल्यानंतर ठरवली जाईल. त्यामुळे योग्य तारीख अजून ठरलेली नाही. मुस्लिमांचा 29 वा रोजा पूर्ण झाल्यावर चंद्र दिसतो. त्यामुळे ईद 10 एप्रिल 2024 रोजीच साजरी केली जाईल, असा अंदाज आहे. जर 30 वा रोजा पूर्ण झाल्यावर चंद्र दिसल्यास ईद 11 एप्रिल 2024 रोजी साजरी केली जाईल. ईदची तारीख एक दिवस आधी चंद्र दिसल्यावरच ठरवली जाते.