
पनवेल(प्रतिनिधी)- महायुतीचे नगर दक्षिणचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांना मोठ्या मताने विजयी करण्यासाठी पनवेलचे भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक ०७ एप्रिल रोजी, सायंकाळी ५ वाजता कामोठे मधील नालंदा बुद्ध विहार मैदानावर पनवेल नवी मुंबई आणि मुंबई स्थित पारनेरकरवासीयांचा परिवार संवाद भव्य मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रमुख निमंत्रक विजय औटी यांनी दिली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी कडून माजी आमदार निलेश लंके तर तत्कालीन नगर दक्षिणचे विद्यमान खासदार डॉ.सुजय विखे पाटील पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भावनिक विरुद्ध विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जात आहे.खासदार सुजय विखे यांनी आपण केलेली पाच वर्षांची विविध कामे,पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १० वर्षातील देश उभारणी साठी महत्वाची पायाभरणी कशी झाली, देशाची आधुनिकतेकडे सुरू असलेली वाटचाल या मुद्द्यावर मतांची मागणी करत आहेत.नवी मुंबईमधील पारनेरकरवासीयांच्या एकजुटीचा आमदार निलेश लंके यांनी राजकारणात शिताफीने वापर केला.मात्र निवडून आल्यानंतर निलेश लंके यांनी पारनेरकर परिवाराची वेळोवेळी मानहानी केली.त्यांच्या दुखावलेल्या भावना, आमदारकीचा निकाल देणाऱ्या नवी मुंबई, मुंबई स्थित पारनेरकर परिवाराला झालेला शून्य फायदा, आमदार झाल्यानंतर बदलले रंग यामुळे सर्व पारनेरकरांनी त्यांना राजकारणातूनच दूर करायचे असा विचार केला आहे. त्या अनुषंगाने या परिवार मेळाव्याचे आयोजन करून करण्यात आले असल्याचे विजुभाऊ औटी मित्र परिवाराने म्हंटले आहे. सदर परिवार संवाद मेळावा यशस्वी करण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्ष, तसेच विजुभाऊ औटी मित्र परिवार,कामोठे रहिवाशी सांस्कृतिक युवा मित्र मंडळ, संदीप पाटील वराळ जनसेवा फाऊंडेशन, सर्व पारनेरकरवासीय काम करत आहेत.