रत्नागिरी, दि. 2 (जिमाका): लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार अथवा पक्षीयस्तरावर प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्यांसाठी सुविधा पोर्टल suvidha.eci.gov.in चा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सर्व नोडल अधिकाऱ्यांची आज आढावा बैठक झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड आदीसह नोडल अधिकारी उपस्थित होते.
माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण, मतदार जनजागृती स्वीप, मनुष्यबळ, वाहने, टपाली मतपत्रिका, आचारसंहिता, इव्हीएम मशीन, मतदान केंद्र नियोजन, कायदा व सुव्यवस्था, निरिक्षकांची व्यवस्था, स्ट्राँग रुम व्यवस्था, दिव्यांग मतदार सुविधा आदींबाबत जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी सविस्तर आढावा घेतला. संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करुन केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.
उमेदवार अथवा पक्षीयस्तरावर प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्यांसाठी भारत निवडणूक आयोगाच्या ‘सुविधा’ या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करुन परवानगी घ्यावी. आचारसंहितेचे तंतोतंत पालन होईल, याची कटक्षाने दक्षता घ्यावी. संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात, असेही श्री. सिंह म्हणाले.