अरुणाचल प्रदेश हा तिबेटचा दक्षिण भाग असल्याचा दावा चीननं केला होता. मात्र अमेरिकेनं चीनचा हा दावा फेटाळून लावला आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग असल्याचं अमेरिकन प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर चीनच्या अधिकाऱ्यांनी अरुणाचल प्रदेशावर आपला दावा सांगितला होता. त्यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. मात्र आता अमेरिकन प्रशासनानं अरुणाचल प्रदेश हा भारतीय प्रदेश असल्याचं स्पष्ट केलं आहे. चीनच्या दाव्याला अमेरिकन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रचंड विरोध केला आहे. नियंत्रण रेषेच्या अलिकडच्या प्रदेशावर चीनच्या सैन्यानं दावा सांगितला होता.
अरुणाचल प्रदेश दक्षिण तिबेट असल्याचा दावा…
चीन सैन्य दलाचे प्रवक्ते कर्नल झांग झियाओगांग यांनी याबाबतचा दावा केला होता. “तिबेट हा झिझांगचा ( तिबेटचं चिनी नाव ) दक्षिण भाग आहे. बीजिंग भारतानं स्थापन केलेल्या अरुणाचल प्रदेशला कधीही मानत नाही. चीन नेहमीच अरुणाचल प्रदेशला विरोध करत राहील,” असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. अरुणाचल प्रदेश हा तिबेटचा दक्षिण भाग आहे, असा दावा करत चीननं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर आक्षेप घेतला आहे. बीजिंगनं या प्रांताचं झांगनान असं नाव देखील ठेवलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेला बोगदा केला राष्ट्राला समर्पित…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 मार्चला उरुणाचल प्रदेशला भेट दिली होती. यावेळी त्यांनी अरुणाचल प्रदेशात 13 हजार फूट उंचीवर बांधलेला सेला बोगदा राष्ट्राला समर्पित केला. हा बोगदा तवांगला हवामान कनेक्टिव्हीटी प्रदान करणारा ठरणार आहे. त्यामुळे या बोगद्यामुळे भारतीय सैन्यदलाला सीमावर्ती प्रदेशात झटपट हालचाली करता येणार आहेत.
चीनच्या दाव्याला प्रचंड विरोध…
अरुणाचल प्रदेशवर चीनच्या सैन्य दलानं दावा सांगितल्यानंतर मोठी खळबळ उडाली. याबाबत परराष्ट्र विभागाचे मुख्य उप प्रवक्ते वेदांत पटेल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी “अमेरिकेनं अरुणाचल प्रदेशला भारतीय भूभाग म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे या प्रदेशात प्रत्यक्ष सीमारेषेवर होणारं कोणतंही अतिक्रमण आणि घुसखोरीला आमचा तिव्र विरोध आहे. चीनचा एकतर्फी दावा आम्ही फेटाळून लावतो,” असं त्यांनी सांगितलं.