बारामती लोकसभेत अजित पवारांना महायुतीतून घेराव घालण्यात आलाय. बारामतीतून सुनेत्रा पवारांविरोधात लढण्यावर शिवतारे पुन्हा तयार झाले असून प्रचारही सुरु केला. शिवतारेंनी भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटेंचे वडील,अनंतराव थोपटेंची भेट घेतली आणि साथ देण्याची विनंती केली. तर इकडे हर्षवर्धन पाटलांनीही फडणवीसांची भेट घेऊन काही बाबींवर मार्ग काढण्याची मागणी केलीय.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंनी पुन्हा अजित पवारांच्या विरोधात मोट बांधण्यास सुरुवात केलीय. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवतारे माघार घेतील असं वाटत होतं.पण आता, पुन्हा बारामती लोकसभेसाठी शिवतारेंनी प्रचार आणि भेटीगाठी सुरु केल्यात. शिवतारेंनी भोरचे आमदार संग्राम थोपटेंचे वडील, अनंतराव थोपटेंची भेट घेतली आणि साथ देण्याची विनंती केली. याआधी शरद पवारांनी 30 वर्षांनंतर अनंतराव थोपटेंची भेट घेत मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वत: संग्राम पाटलांनी सुप्रिया सुळेंचं काम करणार असल्याचं म्हटलं आता शिवतारेंनी अनंतराव थोपटेंची भेट घेतली आणि शिवतारेंना आशीर्वाद असल्याचंही सांगितलं.
मुख्यमंत्र्यांच्या शिवतारेंसोबत 2 बैठका झाल्यात मात्र बारामतीतून सुनेत्रा पवारांविरोधात लढण्यावर शिवतारे ठाम आहेत. मतदार नोटाला मतदान करेल पण अजित पवारांना नाही, अशी टीका शिवतारेंनी केलीय. शिवतारेंनी भोर, वेल्हा आणि मुळशी या परिसरात भेटीगाठी सुरु केल्यात. अजित पवारांवरही हल्लाबोल सुरु केलाय.अजित पवारांचा वाद फक्त शिवतारेंसोबतच नाही. तर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांसोबतही आहे. हर्षवर्धन पाटलांनीही उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. आतापर्यंत 2009 पासून ते 2019 पर्यंत जो अनुभव आला, त्यावरुन माझ्या आणि पदाधिकाऱ्यांच्या मनातली खदखद फडणवीसांसमोर मांडल्याचं हर्षवर्धन पाटील म्हणालेत.
याआधी हर्षवर्धन पाटलांची मुलगी अंकिता पाटलांनीही,अजित पवारांनी विधानसभेला मदतीचं आश्वासन द्यावं त्यानंतरच बारामतीत लोकसभेचं काम करणार असं म्हटलंय. आता फडणवीसांच्या भेटीसाठी हर्षवर्धन पाटलांसोबत अंकिता पाटीलही होत्या. म्हणजेच उघडपणे सध्या बारामती लोकसभेच्या 3 विधानसभा मतदारसंघात अजित पवार घेरले गेलेत.
बारामती लोकसभेत इंदापूर, पुरंदर, दौंड, भोर, खडकवासला आणि बारामती असे 6 विधानसभा मतदारसंघ येतात पुरंदरमध्ये शिवतारेंनी दादांना आव्हान दिलंय. 2019च्या विधानसभेला पुरंदरमध्ये शिवतारेंनी 99 हजार 306 मतं घेतली. 31 हजार मतांनी बापूंचा पराभव झाला होता. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांनी काही बाबी क्लीअर करा असं दादांना सांगितलं. 2019च्या विधानसभेत हर्षवर्धन पाटलांनी 1 लाख 11 हजार 850 मतं घेतली होती.अवघ्या 3 हजार 110 मतांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव झाला आणि बारामतीत तर स्वत: शरद पवारच विरोधात आहेत.
हर्षवर्धन पाटलांसोबतचे मतभेद…
फडणवीस आणि अजित पवारांसोबतच्या बैठकीत मिटतील असं चित्र आहे. पण शिवतारे शेवटपर्यंत लढणार का ? की माघार घेणार हे तूर्तास सांगणं कठीण आहे.