गुहागर : तालुक्याचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या अथक परिश्रमातून रेवस रेड्डी सागरी महामार्गावर दाभोळ खाडीवर दाभोळ ते वेलदूर दोन पदरी मोठ्या खाडी पुलाच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. गुहागर व दापोली या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या व कोकणातील दळणवळणाला व पर्यटनाला मोठी चालना देणाऱ्या दाभोळ खाडीवरील पुलासाठी एकूण ७९८ कोटी ९० लाख ६ हजार २२७ रुपये खर्चाचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केले आहे. या खाडीपुलाच्या अंदाजपत्रकीय खर्चाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासन निर्णयाव्दारे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.या पुलाला मान्यता मिळाल्याने या पुलाचे काम प्रत्यक्षात कधी सुरू होणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहीले आहे.
दाभोळ हे एक ऐतिहासिक वारसा असणारे ठिकाण आहे.
तसेच तेथे मासेमारीचा व्यवसाय देखील मोठा आहे. शिवाय गुहागरमध्ये असणाऱ्या रत्नागिरी गॅस पॉवर कंपनीमुळे गुहागरदेखील जागतिक नकाशावर आहे. दाभोळवरून तर गुहागरला जाण्यासाठी पूर्वी खेड- चिपळूण असा वळसा मारून जावे लागत होते. मात्र सध्या सुरू असणाऱ्या डॉ. चंद्रकांत मोकल व डॉ. योगेश मोकल यांच्या फेरीबोटीमुळे काही तासांचा हा प्रवास काही मिनिटावर आला आहे. तरी देखील या जंगल जेट्टीच्या पडणाऱ्या मर्यादांमुळे येथे कायमस्वरूपी खाडी पूल व्हावा अशी मागणी जोर धरत होती.
या पुलासंदर्भात गुहागर तालुक्यातील माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्याकडे सतत मागणी केली होती. त्यांनीही अनेक वर्ष सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून या पुलाला मंजूरी मिळाली आहे.गुहागर व दापोली पूल झाल्यास गुहागर तालुक्यातील पर्यटन विकास नक्कीच वाढणार असून दापोली मध्ये येणारा पर्यटक हा गुहागर मार्गे वेळणेश्वर हेदवी गणपतीपुळे असा प्रवास करून तो गोव्याकडे रवाना होईल. त्यामुळे दापोलीसह गुहागर तालुक्यात पर्यटकांची संख्या वाढेल व पर्यटकांच्या माध्यमातून गुहागर तालुक्याचा आर्थिक विकास होणार आहे.