मुंबई /16 मार्च- प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आज (१६ मार्च) सकाळी अनुराधा पौडवाल राजधानी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पोहोचल्या होत्या. याच ठिकाणी भाजपने पत्रकार परिषद घेऊन, अनुराधा पौडवाल यांच्या पक्ष प्रवेशाची घोषणा केली. भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अनुराधा पौडवाल यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना अनुराधा पौडवाल म्हणाल्या की, ‘आज मी सनातन धर्माशी सखोल संबंध असलेल्या पक्षात प्रवेश करणार आहे, याचा मला खूप आनंद होत आहे. ३५ वर्षे चित्रपटसृष्टीत गाणी गायल्यानंतर मी फक्त भक्तीगीते गाण्याचा निर्णय घेतला. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेदरम्यान मला तिथे ५ मिनिटे गाण्याची संधी मिळाली. हे माझे आयुष्यातील मोठे स्वप्न होते. आणि आता मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे, हे माझे भाग्य आहे.’
आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यावर गायिका अनुराधा पौडवाल म्हणाल्या, आता तर मला माहीत नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन. तर त्यांच्याकडे एक स्टार प्रचारक म्हणूनही पाहिले जात आहे.