नवीमुंबई, दि. 21:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागाने प्रकाशित केलेल्या लोकसभा निवडणुक पूर्वपीठिका 2024 पत्रकारांसाठी संदर्भ म्हणून उपयोगात येईल. असा विश्वास कोकण विभागचे विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी व्यक्त केला.
आज महसूल आयुक्त कार्यालयात डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेत लोकसभा निवडणूक 1989 ते 2019 पर्यंतचा ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या लोकसभा मतदारसंघांच्या मतांची आकडेवारी देण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने निवडणूक आचारसंहिता आणि मार्गदर्शकतत्वे, निवडणूक आचारसंहिता काळात काय करावे, काय करू नये. राजकीय पक्ष व उमेदवार यांच्या मार्गदर्शनासाठी आदर्श आचारसंहिता याशिवाय वृत्तपत्रांसाठी मार्गदर्शक तत्वे, मतदान यंत्रांची माहिती आणि पेडन्यूज याशिवाय निवडणूक आचारसंहितेची माहिती देण्यात आली आहे.
ही पूर्वपीठिका विभागीय माहिती कार्यालय कोकणभवन कार्यालयाने संकलित केली असून, उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी संपादित केली आहे. तर सहाय्यक संचालक संजीवनी जाधव-पाटील आणि उपसंपादक प्रवीण डोंगरदिवे यांनी या पूर्वपिठीकेसाठी संपादन सहाय्य केले आहे. या छोटेखानी प्रकाशन समारंभावेळी, पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, उपायुक्त (महसूल) विवेक गायकवाड, उपायुक्त (विकास) गिरीश भालेराव, विभागीय निवडणूक अधिकारी अजित साखरे आदि उपस्थित होते.