नेरळ : सुमित क्षीरसागर रिक्षा टॅक्सी चालक हे रोज शेकडो प्रवाशांची ने आण करत असतात. अशात काही संशयास्पद प्रवासी किंवा नागरिक दिसले तर त्यांनी तात्काळ नेरळ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना हि बाब लक्षात आणून द्यावी.रिक्षा टॅक्सी चालक हे पोलिसांचा तिसरा डोळा आहेत. तसेच त्यांनी प्रवाशांशी अदबीने वागावे. काही मदत लागली तर आम्ही सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी मदतीला असूच असे प्रतिपादन नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक यांनी नेरळ येथे केले. नेरळ एसटी स्टॅन्ड येथील जय मल्हार रिक्षा चालक मालक सामाजिक संस्था मंडळ यांच्या अधिकृत रिक्षा स्टँड उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. नेरळ हे शहर असल्याने या शहराला सुमारे ५० गावे जोडलेली आहेत. याठिकाणी प्रवासी वाहतूक रिक्षा टॅक्सी यातून केली जाते. येथे सुमारे २५ वर्ष व्यवसाय करणारे रिक्षा चालक यांनी एकत्र येत नेरळ एसटी स्टॅन्ड परिसरात जय मल्हार रिक्षा चालक मालक सामाजिक संस्था मंडळ स्थापन केले. या मंडळाच्या अधिकृत रिक्षा स्टँडचे उद्घाटन दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी, नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक व दहातोंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या मंडळात साधारण २० रिक्षा चालक आहेत. तसेच प्रवाशांना या स्टँडच्या माध्यमातून उत्तम सेवा मिळेल अशी अपेक्षा सरपंच उषा पारधी यांनी व्यक्त केली आहे. मान्यवरांचे स्वागत सल्लागार दिनेश कालेकर यांनी केले यावेळी रिक्षा स्टँडचे अध्यक्ष श्रावण जाधव, सल्लागार दिनेश कालेकर, संतोष सारंग, भगवान जमघरे हरेश्र्वर विरले, देवा पेरणे, आदिसह रिक्षा चालक उपस्थित होते.
जाहिरात