रत्नागिरी: केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यत पोहोचण्याच्या उद्देशाने “विकसित भारत संकल्प यात्रा” या मोहिमेला पालकमंत्री उदय सामंत यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.
यावेळी जिल्हाधिकारी देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, मुख्याधिकारी तुषार बाबर, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा ही महत्वकांक्षी योजना देशात राबविली जात आहे. यासाठी 9 तालुक्यासांठी 7 मोठ्या गाड्या आहेत. शासन आपल्यादारी ज्या पध्दतीने कार्यक्रम राबविण्यात आला होता. तशाच प्रकारे हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जे लाभार्थी नाहीत त्यांना लाभार्थी बनवणे, जे लाभार्थी आहेत, त्यांना लाभ मिळतोय की नाही हे पाहणे. जर लाभ मिळत नसेल, तर कोणत्या यंत्रणेमुळे मिळत नाही, तर जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देणे. शासनाकडून सर्व सामान्य जनतेला चांगल्या प्रकारची वागणूक मिळावी, हा संकल्प या योजनेतून केला जाणार आहे. या गाड्यांमधून प्रत्येक गावांमध्ये योजनांची जनजागृती केली जाणार आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. याची नोंद जिल्हाधिकाऱ्यांकडे राहणार आहे. ही मोहीम 26 जानेवारी 2024 पर्यंत चालणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, हा उपक्रम पूर्ण देशामध्ये राबविला जात आहे. आपल्या जिल्ह्यात 842 ग्रामपंचायती असून, 1538 गावे आहेत. जिल्ह्यामध्ये 26 जानेवारी 2024 पर्यंत प्रत्येक गावांमध्ये या गाड्या जाणार आहेत. सर्व लाभार्थ्थां पर्यंत पोहचून योजनांचा लाभ भेटला की नाही, ज्यांना योजनांचा लाभ भेटला नसेल, त्यांचा समावेश करुन येणाऱ्या काळामध्ये त्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न आहे. या माध्यमातून विविध शासकीय योजनांची प्रसिद्धी केली जाणार असून, गरजू लाभार्थ्यांचा शोध घेणे, त्यांना प्रत्यक्ष योजनांची माहिती देणे, त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हे उपक्रम राबविले जाणार आहेत. सर्व नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा. शासन व प्रशासन आपल्या पाठीशी आहे, असेही ते म्हणाले.