‘इग्नाईट’ महाराष्ट्र कार्यशाळेचे उद्योगमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन कार्यशाळेच्या माध्यमातून केंद्र व राज्याच्या योजना तळागाळात पोहचवा, नवे उद्योजक घडवा – उद्योग मंत्री उदय सामंत..

Spread the love

रत्नागिरी,(जिमाका) : जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने अशा कार्यशाळा तालुक्यात झाल्या पाहिजेत. या कार्यशाळेच्या माध्यमातून केंद्र व राज्याच्या योजना विशेषत: पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, विश्वकर्मा आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तळागाळात पोहचल्या पाहिजेत. यातून नवे उद्योजक निर्माण होतील, त्यासाठी बँकांनी सकारात्मक आणि संवदेनशील दृष्टीकोण ठेवावा, अशी अपेक्षा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केल्या.

उद्योग संचालनालय, स्मॉल इंडस्ट्रिज डेव्हलमेंट बँक ऑफ इंडिया (सीडबी) आणि आयडीबीआय कॅपीटल डिस्ट्रीक्ट इंडस्ट्रिज सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने इंडस्ट्रिज गव्हरन्मेंट नेटवर्कीग फॉर एक्सक्ल्युझीव ट्रॉन्सफाॕरमेशन आणि इनपाॕवरमेंट अर्थात ‘इग्नाईट’ या कार्यशाळेचे उद्योगमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते येथील स्वयंवर सभागृहात उद्घाटन झाले. या निमित्ताने यावेळी आयोजित केलेल्या वस्तू विक्री प्रदर्शनाचे देखील उद्योगमंत्रीश्री. सामंत यांनी फीत कापून उद्घाटन केले. या प्रदर्शनाची पाहणी करत लाभार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रिय प्रबंधक नवीन निश्चल, प्रांताधिकारी जीवन देसाई, अग्रणी बँक व्यवस्थापक मुकुंद खांडेकर आदी उपस्थित होते.

उद्योगमंत्री श्री. सामंत मार्गदर्शन करताना म्हणाले, ज्यावेळी महाराष्ट्रात ताकदीने स्टार्टअप सुरु करु, खऱ्या अर्थाने रोजगार मिळणार आहे.

सीएमईजीपी तळागाळात पोहचवू शकलो, तर अनेक लोकांना रोजगार मिळेल. अनेक लोक उद्योजक बनतील. नोकरी करणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे निर्माण होतील. बँकांची मानसिकता सकारात्मक असायला हवी. कर्ज मिळालेल्या १२ लाखांचे १२ कोटी करु शकतो, हा आत्मविश्वास बँका त्यांच्यामध्ये निर्माण करु शकतात. बँकांकडे गेल्यानंतर सकारात्मकता दाखवत आठ दिवसात कर्ज मंजूर केलेल्या बँकांना मी धन्यवाद देतो.


बँकांची, अधिकाऱ्यांची मानसिकता अशी असली पाहिजे, दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा मी जादा प्रकरणे मंजूर करेन. त्याचबरोबर अधिकारी आणि बँकांना व्यवस्थितरित्या योजनांचे मार्गदर्शन करावे. या योजनांचा प्रचार आणि प्रसार अशा कार्यशाळांमधून झाला पाहिजे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी अशा कार्यशाळा ठेवा. त्यांच्या मुलांना या योजनांचा लाभ झाला पाहिजे. जास्तीत जास्त कर्ज प्रकरणे मंजूर करुन नवे उद्योजक घडवा. त्यांना त्यांच्या स्वत:च्या पायावर उभे करा, असे आवाहनही उद्योगमंत्र्यांनी केले. वैभवी बने या लाभार्थीने मनोगत व्यक्त करुन आपला अनुभव सांगितला.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण यावेळी लाभार्थ्यांना करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. व्यवस्थापक हरिभाऊ आंधळे यांनी आभार प्रदर्शन केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page