नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे याविरोधात मागील आठवड्यापासून धडाकेबाज कारवाई सुरू केली असून शुक्रवारी महापालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापूर विभागात विविध हॉटेल चालकांनी अनधिकृतरीत्या बांधलेल्या शेड व बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात आली.
बेलापूर विभाग कार्यालय क्षेत्रातील सेक्टर १५ येथील महेश हॉटेल, प्रणाम हॉटेल, हॉटेल लक्ष्मी, मालवणी कट्टा, अश्विथ हॉटेल, मॅकडोनाल्ड्स, कबाना बार, द स्कॉड, द चाप हाऊस, पॅनेशिया, एस स्पाईस हे व्यावसायिक मार्जिनल स्पेसचा शेड टाकून वापर करीत होते.
तसेच सन-सिटी इमारतीसमोर विनापरवानगी पावसाळी शेड उभारण्यात आली होती. या अनधिकृत बांधकामांस व वापरास बेलापूर विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमानुसार नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. बेलापूर विभाग कार्यालयामार्फत तोडक कारवाई करून २५ लाख रुपये इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी शशिकांत तांडेल, संजय तायडे, सागर मोरे, प्रबोधन मवाडे यांच्या नियंत्रणाखाली तसेच विविध प्रशासकीय अधिकारी यांच्या सहयोगाने अतिक्रमण विभागाकडील पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण शेड, बांधकाम तोडण्यात आले. या धडक मोहिमेसाठी बेलापूर विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व ४० मजूर कार्यरत होते. यामध्ये चार गॅस कटर, एक इलेक्ट्रिक हॅमर, तीन जेसीबी व एक पोकलेन यांचा वापर करण्यात आला.
जाहिरात