स्वच्छतेबाबत वारंवार तक्रारी करूनही एस.टी. प्रशासन उदासीन… युवकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर प्रशासनाने परिसर स्वच्छ करण्याबाबत आश्वासन दिले.

जनशक्तीचा दबाव न्यूज | संगमेश्वर | सप्टेंबर २९, २०२३.
संगमेश्वर एस.टी. बस स्थानकातील सार्वजनिक स्वच्छतागृहे व परिसरातील अस्वच्छतेमुळे प्रवासी त्रस्त झाले होते. याबाबत वेळोवेळी तक्रारी, विनंत्या करूनदेखील प्रशासनाने कानाडोळा करत उदासीनता दर्शवली. संपूर्ण परिसरात दुर्गंधीमुळे नागरिकांना तीव्र शिसारी आणि श्वसनाच्या त्रासाला सामोरे जावे लागते. एस.टी. महामंडळाचे अधिकारी मात्र जणू स्वच्छतेचा आपल्याशी काहीच संबंध नाही अशा आविर्भावात या घाणीच्या साम्राज्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे भाजपाचे युवा कार्यकर्ते श्री. मिथुन निकम तसेच सुभेदार फाऊंडेशनचे त्यांचे सहकारी श्री. सुधीर चाळके व श्री. दीपक चाळके यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर एस.टी. बस स्थानकाच्या स्वच्छतेसाठी डिंगणी खाडीभागातील युवक सरसावले.
एस.टी. प्रशासनाने स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेविषयी हलगर्जीपणा न करता सफाई कर्मचार्यांच्या समस्या समजून घ्याव्यात. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब विविध माध्यमांमधून वारंवार स्वच्छतेचा जागर करत असूनदेखील संगमेश्वरसारख्या ठिकाणी असलेली स्वच्छतेबाबतची अनास्था खेदजनक आहे. त्यामुळे येत्या १ ऑक्टोबरपर्यंत प्रशासनाने एस.टी. स्थानकावरील स्वच्छतेबाबत अनुकूल भूमिका घ्यावी व परिसरातील दुर्गंधी समूळ नष्ट करून प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी आपले कर्तव्य बजावावे. याबाबत संबंधित ठेकेदार अथवा प्रशासनाने योग्य ती व्यवस्था करणे अपेक्षित असून कोणतीही कारणे ऐकून घेतली जाणार नाहीत. त्याऐवजी आम्ही स्वतः स्वयंस्फूर्तीने सर्व घाण दूर करू आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा अनुभव प्रशासनाला देण्यासाठी तीच घाण कंट्रोल केबिनमध्ये टाकू असा निर्वाणीचा इशारा संतप्त युवकांनी दिला. याबाबत प्रशासनाच्या वतीने दोन दिवसांत संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचे आश्वासन मिळाले असल्याचे भाजपाचे तडफदार कार्यकर्ते श्री. मिथुन निकम यांनी सांगितले. त्यांनी घेतलेल्या या पुढाकाराने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी श्री. मिथुन निकम यांच्यासोबत श्री. सुधीर चाळके, श्री. दीपक चाळके, श्री. मयुर निकम, श्री. जयकुमार चाळके, श्री. मुरलीधर चाळके यांच्यासह डिंगणी खाडी पंचक्रोशीतील अनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते.