पुणे ,26 सप्टेंबर-
सालाबाद प्रमाणे महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाच्या आणि वरिष्ठ अजिंक्यपद माती-गादी कुस्ती स्पर्धेचा थरार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रंगणार आहे. यंदा या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सोमेश्वर प्रतिष्ठानला मिळाली असून, पुणे जिल्ह्यातील लोणीकंद-फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक स्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा भव्य स्वरूपात होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस आणि ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे मुख्य संयोजक सोमेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक व पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे संचालक प्रदीप कंद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर मान्यवर व्यक्तींना या स्पर्धेसाठी आमंत्रित करणार असल्याचे रामदास तडस यांनी यावेळी सांगितले. “सलग सहा दिवस या स्पर्धेचा थरार रंगणार असून, राज्यभरातील मल्ल एकमेकांशी दोन हात करणार आहेत. 35 जिल्ह्यातील आणि 11 महापालिकामधील 46 तालीम संघातील 900 ते 925 मल्ल या स्पर्धेत सहभागी होत आहेत. यासह नामांकित 40 मल्लही सहभागी होणार आहेत. अतिशय रंजक अशा लढती पाहण्याची संधी आहे. आपल्या मल्लांनाही या स्पर्धेचा निश्चित फायदा होणार आहे. उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्त्या पाहण्याची संधी मिळणार आहे. विविध दहा वजनी गटात, माती आणि गादी विभागात कुस्ती होतील. 900 पेक्षा अधिक कुस्तीगीर, 90 व्यवस्थापक, 90 मार्गदर्शक, 125 तांत्रिक अधिकारी, 90 पदाधिकारी सहभागी होणार आहेत.