नवी मुंबई कोपऱखैरणेतील एक दिवसाआड सीबीएसई शाळेविरोधात पालक व विद्यार्थ्यांचा एल्गार!

Spread the love

दबाव वृत्त : नवी मुंबई महापालिकेत पालिकेच्या सीबीएसई शाळांचा टेंभा मिरवणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा नियोजन शून्य कारभार समोर आला आहे. गेल्या वर्षभरापासून शिक्षकांचा तुटवडा जाणवणाऱ्या कोपरखैरणे येथील पालिकेच्या सीबीएसई शाळेत आवश्यक  शिक्षक संख्येअभावी सोमवारपासून शाळा एक दिवसाआड चालवण्याची नामुष्की ओढवली आहे.गेल्यावर्षापासून पालकांना व विद्यार्थ्यांना फक्त  शिक्षक मिळतील अशी आश्वासनांची पाने पुसणाऱ्या पालिकेविरोधात गुरुवारी पालकांनी शाळेबाहेरच शाळेत प्रवेश बंद आंदोलन करण्याचा इशारा पालिका प्रशासनाला दिला आहे. तर सोमवारी पालिका मुख्यालयातच शाळा भरवली जाणार आहे. त्यामुळे कोपरखैरणेतील सीबीएसई शाळेतील शिक्षकांच्या तुटवड्याचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे.

मागील वर्षभरापासून अपुऱ्या शिक्षक संख्येअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. नवे शैक्षणिक वर्ष सुरु झाले तरी फक्त आश्वासनच दिले जात असून  १३७५ विद्यार्थ्यांना फक्त ५ शिक्षक आहेत. त्यामुळे कशीबशी शाळा चालवण्यासाठी पहिली दुसरीचे वर्ग सोमवार बुधवार शुक्रवार या दिवशी तर तिसरी ते पाचवी चे वर्ग मंगळवार गुरुवार शनिवारी भरवण्यात येत आहे. सहावीचा वर्ग मात्र दररोज शाळेत बोलवण्यात येणार  आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या सीबीएसई शाळांचा श्रीगणेशा ४ ऑगस्ट २०१८ पासून झाला. सीवूड्स   व कोपरखैरणे येथे पालिकेच्या २ सीबीएसई शाळा पालिकेने सुरु केल्या. पण अपुऱ्या शिक्षकांअभावी पालिका चालवत असलेल्या कोपरखैरणेतील सीबीएसई शाळेतील शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. तर दुसरीकडे  पुण्यातील आकांक्षा संस्थेद्वारे चालवण्यात येणारी सीवुडस येथील शाळा मात्र अत्यंत व्यवस्थितपणे सुरू आहे.१५ जूनपासून राज्यभरातील शाळा सुरू झाल्या आहेत.परंतु  नव्याने सुरु झालेल्या  शैक्षणिक वर्षातही पुरेसे शिक्षक नसल्याने  कोपरखैरणे येथील सीबीएसई शाळा सोमवारपासून एक दिवसाआड भरण्याची  नामुष्की ओढवली आहे.  सीवूड्स येथील आकांक्षा संस्था चालवत असलेल्या शाळेत सुमारे ११५०  विद्यार्थ्यांना ५२ शिक्षक व ७ मदतनीस तर कोपरखैरणेत  १३७५ विद्यार्थ्यांना फक्त ५ शिक्षक आहेत.

एकंदरीत  सर्व शिक्षा अभियानांतर्गत ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अशी नियमावली असताना कोपरखैरणे येथील सीबीएसई शाळेत इयत्ता चौथीचे १३० विद्यार्थी इयत्ता पाचवी चे १४० विद्यार्थी यांना १ शिक्षक  याप्रमाणे  हॉलमध्ये  शिक्षण घेण्याची वेळ महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे ओढवली आहे.मागील वर्षभर शिक्षक भरती करण्यासाठीचे  गुऱ्हाळ अद्याप सुरूच आहे.

कोपरखैरणे येथील सीबीएसई शाळेत शिक्षक संख्या कमी असल्याने लवकरात लवकर त्या ठिकाणी शिक्षकांची नेमणूक करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे.

दत्तात्रय घनवट , उपायुक्त शिक्षण विभाग

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page