लेखन – श्री. योगेश अरविंद मुळे (सोशल मिडिया संयोजक, संगमेश्वर-चिपळूण विधानसभा मतदारसंघ, भाजपा)
जनशक्तीचा दबाव न्यूज | मे २०, २०२३.
“जे का रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले |
तोचि साधू ओळखावा | देव तेथेची जाणावा ||”
त्रिविध तापांनी पोळलेल्या जीवाला छायेत घेऊन त्यांच्या खऱ्या हिताची काळजी वाहणारा कणखर मनाचा, संयमी आणि संवेदनशील माणूस ‘साधू’ म्हणून ओळखला जातो. आजच्या धकाधकीच्या जीवनात सामान्य माणूस सर्वार्थाने त्रस्त आहे. अचानक उद्भवणाऱ्या समस्या आणि पारंपारिक समस्या यांच्या प्रभावाने त्रस्त असलेल्या समाजाला अशाच एका ‘साधू’वृत्तीच्या माणसाची आवश्यकता असते; जो प्रसंगी देवासारखा धावून येईल. गुहागर तालुक्याच्या मातीने स्वर्गीय तात्यासाहेब नातू यांच्यासारखे माणसातले देव समाजाला दिले. याच मांदियाळीत नाव येते ते मा. संतोषदादा जैतापकर यांचे.
ते डॉक्टर नाहीत, पण डॉक्टरपेक्षा कमी नाहीत. जे कंत्राटदार नाहीत, पण या क्षेत्रात योगदान देण्यात कोणाच्याही मागे नाहीत. शैक्षणिक असो व सामाजिक, क्रीडा असो वा सांस्कृतिक अशा प्रत्येक क्षेत्रात आपल्या अस्तित्त्वाचा ठसा उमटवून लोककल्याणाचे कार्य अविरतपणे चालवणारे श्री. संतोष जैतापकर एक आदर्श समाजसेवक म्हणून नावारूपास आले आहेत. आमदार, खासदार म्हणून जितक्या नम्रतेने आणि सेवाभावी वृत्तीने कार्य करणे लोकशाहीला अभिप्रेत आहे त्याहूनही अधिक सेवाभावाने संतोषदादा समाजसेवा करतात, हा लोकांचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांचे अनेकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार डॉ. विनयजी नातू साहेबांच्या बरोबरीने उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे संघटन करण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर सोपवली आहे. या जबाबदारीचे अत्यंत कुशलतेने निर्वहन करत त्यांनी राजकीय वर्तुळात आपला ठसा उमटवला आहे. आपल्या वैद्यकीय टीमच्या माध्यमातून अनेक गरजू रूग्णांना शासनाच्या आर्थिक सहाय्याचा लाभ मिळवून दिला आहे. अनेक अपघातप्रसंगी दादांनी केलेली मदत सांगताना लाभार्थ्यांचे डोळे पाणावतात. आज प्रत्येक अडचणीच्या वेळी गुहागरमधील लोक विश्वासाने मदत मागतात ती संतोषदादा जैतापकर यांच्याकडेच.
अनेक दुर्गम भागांत आजही पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत ही दुर्दैवी गोष्ट आहे हे दादांच्या लक्षात आले. सोबतच सरकार इतक्या सर्व ठिकाणी लक्ष घालण्यात असमर्थ ठरत असल्याची जाणीव त्यांना झाली. आणि मग त्यांनी निर्णय घेतला ‘Charity begins at home.’ याद्वारे त्यांनी अनेक ठिकाणी स्वखर्चाने रस्ते, पाखाड्या बांधून दिल्या आहेत. अनेक प्रवासी निवारा शेड, मंदिरांचे नुतनीकरण अशी कामेही त्यांनी करून दिली आहेत. सरकारी मदत मिळवून देण्यासाठी अग्रेसर असलेले संतोषदादा स्वतःचा स्वकष्टार्जित पैसा जनसेवेसाठी खर्च करू लागले. सत्पात्री दान करणे ही भारतीय संस्कृती आहे. आणि दादा ही संस्कृती जपत आहेत. जनताजनार्दन रूपी परमेश्वर या गोष्टीचे फळ त्यांना योग्य वेळी देईलच.
गुहागरमधील गुणवंत खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या दादांचा युवावर्ग अक्षरशः फॅन आहे. अनेक प्रकारच्या क्रीडास्पर्धांना प्रोत्साहन देणारे संतोष जैतापकर प्रत्येक स्पर्धेच्या उद्घाटनाला किंवा पारितोषिक वितरण समारोहाला असावेत असा आयोजकांचा हट्ट असतो. मात्र दादा एकाचवेळी अनेक ठिकाणी उपस्थित राहू शांत नसल्याने अनेक ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी उपस्थित रहातात. शाळा हा दादांच्या आवडीचा विषय. “मुलांनी शिकलं पाहिजे. अडचणी ह्या असणारच. त्या दूर करण्यासाठी मी आहे.” असे म्हणणारे संतोषजी प्रत्येकवेळी शाळांना भेट देण्याचा, शिक्षक व पालकांसोबत चर्चा करून समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर या समस्या दूर करण्याची जबाबदारी घेऊन ‘तुम्ही फक्त अभ्यास करा रे’ अशी प्रेमळ तंबी विद्यार्थ्यांना देतात.
याशिवाय कविमनाचे संतोषदादा साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात रूची दाखवतात. नमन, नाट्य, भारुड, भजन, जाखडी, शक्तीतुरा एक ना अनेक क्षेत्रांचे पुरस्कर्ते म्हणून त्यांची कोकणात ओळख आहे. सिनेक्षेत्रात चांगली ओळख असून अनेक तरुणतरुणींना संधी उपलब्ध करू देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.
कोरोनाकाळात अनेक कुटुंबांची घडी विस्कटू नये यासाठी असलेले त्यांचे योगदान लोक कधीही विसरणार नाहीत. कोविड योद्धा, सामाजिक कार्यकर्ता, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान आणि अनेक कामगिरींसाठी दादांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. हे सर्व पुरस्कार निश्चितच त्यांच्या कामगिरीची साक्ष देतात. पण कामगिरीचे मूल्यमापन पुरस्काराने नाही तर लोकांच्या भावनांनी होते. त्यामुळे सर्व पुस्कारांचा सन्मान राखून आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची अतिशयोक्ती न करता अतिशय जबाबदारीने विधान करतो की “मा. संतोषदादा जैतापकर साहेब यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य हे कोणत्याही पुरस्काराच्या मोजपट्टीने मोजता येणारे नाही. यासाठी अशा बुलंद व्यक्तिमत्त्वाला एकच पारितोषिक मिळायला हवे ते म्हणजे जनाधार… जनमताचा कौल. २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेची रणधुमाळी असणार आहे. त्यावेळी मायबाप मतदारांनी आपला कौल संतोष जैतापकर यांच्या बाजूने दिल्यास गुहागर विधानसभेला हक्काचा माणूस मिळेल. आणि विकसाचा मार्ग सुलभ होऊन सर्व प्रकारच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघेल.”
आज दादांचा वाढदिवस. वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच त्यांच्या उदंड निरामय आयुष्यासाठी आई महालक्ष्मी अंबाबाईचरणी प्रार्थना करतो. सोबतच त्यांची समाजसेवेची इच्छा अनेक वर्षे पूर्ण होत राहू दे. त्यांच्याकडून अनेकांचा सर्वांगीण विकास होऊ दे अशी सदिच्छा व्यक्त करतो. माझ्यासारखे अनेक तरुण त्यांच्या कार्याने प्रभावित झाले आहेत. त्यांच्या कार्याचा आलेख नेहमीच चढता राहील याची आम्हाला खात्री आहे. यामुळेच मी त्यांना ‘सामाजिक क्षेत्रातील ध्रुवतारा’ असेच संबोधेन.
त्यांचे कार्य दोन ओळींत सांगायचे झाल्यास मला पसायदानातील या दोन ओळी आठवतात –
दुरितांचे तिमिर जावो | विश्व स्वधर्म सूर्ये पाहो |
जो जें वांछिल तो ते लाहो | प्राणीजात ||