विद्या भगवान कोटक फाऊंडेशन व टाटा ट्रस्टचे सहकार्य.
चिपळूण : कोकणच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता ठासून भरली आहे. डोंगरदर्याच्या सान्निध्यामुळे या मुलांना विपरीत परिस्थितीची झुंजण्याचं अलौकिक बळ देखील निसर्गतःच मिळाल आहे. गावकुसापासून दूरवरच्या वाड्यावस्त्यांवरील त्या साऱ्या अडचणींच्या जंगलवाटा तुडवत शिक्षणासाठी चाललेली पायपीट. यात कुणी अर्थ दुर्बल तर कोणी कौटुंबिक आधार गमावलेला अशा साऱ्या देशाच्या भावी आधारस्तंभाना शिष्यवृत्तीतून सहकार्याचा स्नेहार्द हात देण्याचा उपक्रम दिशान्तर संस्थेने ज्ञानयज्ञ प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू ठेवला असून त्यायोगे गत पाच वर्षात ३५ लाखावर रक्कम विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.
माध्यमिक शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहराकडे जाणे, डोनेशन, रोजचा प्रवास व बाहेरगावी राहण्याचा खर्च अशा साऱ्यांमुळे अंगी गुणवत्ता असूनही उच्च शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळे येतात. गावकुसापासून दूरवर राहणाऱ्यांना जंगल वाटा तुडवत शाळेत यावे लागते. शिक्षणासाठी चाललेली पायपीट प्रसंगी सहन होते. यात कुणाची आई नाही तर कुणाचे वडील नाहीत.. कुणाचे दोघेही नाहीत. तर दुसरीकडे आई-वडील आहेत पण अल्प उत्पन्नामुळे केवळ पोट भरण्यापुरते साधन उपलब्ध. अशा कौटुंबिक निराधार व अर्थ दुर्बल स्थितीतील प्रज्ञावंत युवाशक्तीला देशाचे उद्याचे आधारस्तंभ केवळ म्हणून चालणार नाही तर त्यांना स्नेहार्द पाठबळाची गरज असते.
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील दुर्गम वाडी वस्तीवर काम करताना दिशान्तर संस्थेला विद्यार्थ्यांची ही व्यथा लक्षात आली होती. यातूनच ज्ञानयज्ञ प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. याचे तीन टप्पे आहेत पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या पेन कंपास पेटी परीक्षा पॅड खाऊ डब्बा पाणी बॉटल अशा शैक्षणिक साहित्यासह दप्त देण्यात येते. कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कला वाणिज्य विज्ञान अशा तीन शाखे करिता क्रमिक अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकांची पेढी कॉलेज निहाय उपलब्ध करून देण्यात आली आहे. २५ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. याच जोडीने काही विद्यार्थ्यांना एसटी पासेस देखील देण्यात आले आहेत. ज्ञानयज्ञ प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात शिष्यवृत्ती देण्यात येते. गत पंधरा वर्षापासून दिशान्तर संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. पाच वर्षांपासून टाटा एज्युकेशन ट्रस्ट तर्फे या कामाला बळ मिळाले आहे.
शिष्यवृत्ती मध्ये यावर्षी ८४ विद्यार्थ्यांना ३ लाख ४८ हजार ८०० रुपयांचे वितरण करण्यात आले. ही रक्कम विद्यार्थी किंवा संबंधित संस्था शाळेच्या खात्यात जमा केली जाते. त्यासाठी विहित नमुन्यात अर्ज तसेच इतर शैक्षणिक कागदपत्र शाळेचे पत्र आदींची पूर्तता करावी लागते. यानंतर पाठविलेल्या विद्यार्थी प्रस्तावातून निकषाअंती शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. यावर्षीचे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी हे चिपळूण खेड गुहागर व मंडणगड या तालुक्यातील आहेत.
दिशान्तरतर्फे प्रस्तावित विद्यार्थ्यांची गृहभेट, पालक संवाद या शैक्षणिक प्रगती व एकूणच सर्वंकष माहिती घेऊन शिष्यवृत्ती निवड केली जायची. प्रसंगी भिक्षांदेही करून दिशान्तर संस्थेने यापूर्वी लक्षावधींची रक्कम विद्यार्थ्यांसाठी उभी केली. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च, फी, निवास व जेवणाची व्यवस्था मोठ्या शहराकडून गावाकडचा प्रवास ..असा सारा खर्च उचलण्यात आला. भगवान कोटक फाउंडेशनतर्फे दहा वर्षापासून ग्रामविकास व शिष्यवृत्ती या कामासाठी योगदान देण्यात येत आहे यातून वैयक्तिक स्तरावर देखील विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यात आले आहे. दररोज पाच ते आठ किलोमीटर पायपीट करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी २०० सायकलींचे वितरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यातून उच्च शिक्षण घेते झालेल्या युवाशक्तीने नोकरी व्यवसायातून आत्मनिर्भरता साधली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे राजेश जोष्टे, सीमा यादव, शर्वरी कुडाळकर व सर्व संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे.