मुंबई प्रतिनिधी : महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि ठाकरे गटात पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.अलीकडेच महाड इथं उद्धव ठाकरेंची सभा झाली. त्यात सभेत काँग्रेसच्या स्नेहल जगताप यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंना सांगूनही त्यांनी ऐकलं नाही असं म्हणत पटोलेंनी नाराजी व्यक्त केली.
नाना पटोले म्हणाले की, आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितले होते आपण असं करू नका, परंतु त्यांनी ते केले आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षालाच कमजोर करण्याचे काम होत असेल तर ते चुकीचे आहे. महाविकास आघाडीची बैठक होईल तेव्हा याविषयावर चर्चा करू. महाडची ती जागा काँग्रेस पक्षच लढवेल असंही पटोलेंनी स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे महाडच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.