तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ८ जणांचा होरपळून मृत्यू…

Spread the love

चेन्नई- तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच महिलांसह ८ कामगारांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत १२ जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना शिवकाशीजवळ सेंगामालापट्टी गावात श्री सुदर्शन फायरवर्क्स कारखान्यात घडली.

देशाचं फटाका केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवकाशी शहरात ही दुर्घटना घडली आहे. या गावात स्फोटाच्या घटना वारंवार घडत असतात. दुपारी जेव्हा कर्मचारी वर्किंग शेडमध्ये फॅन्सी फटाके बनवत होते तेव्हा घर्षण झाल्याने त्याचा स्फोट झाला. याची आग आसपासच्या शेडमध्ये पसरली. माहिती मिळताच अग्निशमन दल व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळवले गेले. या दुर्घटनेतील जखमींना शिवकाशी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमी झालेल्यांमध्ये एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगतिले जात आहे. आग लागण्याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त करत जखमींना योग्य उपचार दिले जावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या स्फोटानंतर फॅक्ट्रीच्या 7 खोल्यांमध्ये ठेवलेले फटाके जळून खाक झाले आहेत. या फटाका फॅक्ट्रीकडे लायसन्स असल्याची माहितीही समोर येत आहे. निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाल्यानंतर मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मदत केली जाईल, असं मुख्यमंत्री स्टालिन यांनी सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकीमुळे 4 जूनपर्यंत आचारसंहिता लागू आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page