नरवण कुणबी ग्रामस्थ मंडळ (रजि.), मु.नरवण, ता.गुहागर, जि.रत्नागिरी या मंडळाचा ५५ वा वर्धापनदिन सोहळा ०४ मे २०२४ ते ०८ मे २०२४ या कालावधीत लोकांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात साजरा झाला. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते…

Spread the love

गुहागर ,प्रतिनिधी- तरूणांसाठी दिनांक ०४ व ०५ मे रोजी “क्रिकेटचे सामने” भरविण्यात आले होते. गावातील विविध संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. नरवण भंडारवाडा येथिल मास्टर अविनाश क्रिकेट संघ व जांगलदेव क्रिकेट संघ (सनगरेवाडी,नरवण) यांच्यात अंतिम लढत झाली आणि यात मा.अविनाश संघ विजयी झाला.

यातीलच एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे “रक्तदान शिबिर”. रविवार, दिनांक ०५ मे २०२४ रोजी डाॕ.करूणा अरूण देवाळे यांचे चैतन्य क्लिनिक, नरवण येथे मंडळाच्या वतीने “रक्तदान शिबिर” आयोजित करण्यात आले होते. वालावलकर हॉस्पिटल, डेरवण यांच्या कडून डॉ.सुनिता झुंजारवाड मॕडम (बी.टि.ओ.), प्रितम गवळी सर (टेक्निकल सुपरव्हायझर), नम्रता आयरे मॕडम (टेक्निशियन), समृद्धी गांधी (टेक्निशियन), पर्णिका सुर्वे (टेक्निशियन), सिद्धी शिरधनकर, सानिका नरवणकर, सचिन राणिम हे सर्व युनिट उपस्थित होते. गावातील ५६ लोकांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. रक्तदात्यांना मंडळातर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हेदवी आरोग्य केंद्राच्या परिचारीका सौ.लक्ष्मी बिर्जे मॕडम यांनी या उपक्रमाला उपस्थिती दर्शविली. सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.


महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. गावातील बहुसंख्य महिलांनी या स्पर्धांचा आनंद घेतला. या स्पर्धेचे नियोजन स्थानिक व मुंबई महिला मंडळाने केले होते.

दिनांक ०६ मे रोजी सकाळी “सत्यनारायणाची महापुजा” आयोजित करण्यात आली होती. सर्व ग्रामस्थांनी तिर्थप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी महिलांसाठी “हळदिकुंकू” समारंभ आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर मंडळाने तयार केलेल्या “स्मरणिकेचे” अनावरण करण्यात आले तसेच नमन या लोककलेसाठी आयुष्य वेचणा-या ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. रात्री ९ वाजता गावातील लोकांनी भजनाचा आनंद लुटला. तालुक्यातील अनेक मान्यवरांनी पूजेसाठी उपस्थिती दर्शविली.

दिनांक ०८ मे रोजी ७० कलाकारांना एकत्र घेऊन अनंत मालप व महेश धनावडे निर्मित, उदयकुमार देसाई लिखित, सुभाष गोताड दिग्दर्शित आणि प्रशांत आलीम सहदिग्दर्शित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमाची यशोगाथा वर्णन करणारे दोन अंकी ऐतिहासिक महानाट्य “शिवप्रताप” सादर करण्यात आले. जवळजवळ तीन ते साडै तीन हजार प्रेक्षक नाटकाच्या शेवटच्या क्षणापर्यंत उत्साहानं थांबून होते. डोळ्यांचे पारणे फिटावे असा हा नाट्यप्रयोग प्रेक्षकांना आनंद देणारा ठरला. मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री.अनंत सखाराम मालप साहेब व कार्यकारीणी तसेच स्थानिक रजिस्टर मंडळाचे अध्यक्ष श्री.बाळ यशवंत गोताड साहेब व कार्यकारीणी त्याचबरोबर मंडळाच्या सर्व सदस्यांनी अत्यंत कष्टाने हा कार्यक्रम यशस्वी केला. या संपूर्ण कार्यक्रमात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानण्यात आले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page