नेरळ: सुमित क्षीरसागर
नेरळ जवळील एका कृषिपर्यटन ठिकाणी मुंबई येथील शाळेची सहल आली होती. मात्र ती सहल ज्या बस मध्ये आली होती त्याच बसच्या चालकाने ५ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी चालकावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सेवन आईल्स इंटरनॅशनल स्कुल मुलुंड येथील विद्यार्थिनींची दिनांक १ फेब्रुवारी रोजी शाळेची सहल आयोजित करण्यात आली होती. हि सहल नेरळ मालेगाव येथील प्रसिद्ध कृषी पर्यटन केंद्र सगुणा बाग येथे आली होती. सकाळी ९ वाजता हि सहल सगुणा बाग येथे आली तर सायंकाळी ६ वाजता येथून निघाली. मात्र घरी गेल्यावर त्यातील ५ विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना येथील विचित्र घटना सांगितली. सुमारास सहल बस क्रमांक एमएच ४३ बीपी ४२९८ मध्ये आली असताना दुपारी या बसचा चालक अंकुश अडागळे वय १८ रा. सातारा यांनी यातील ५ अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत चुकीचा स्पर्श केला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पालकांनी शाळा प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली. त्यामुळे शाळेने याबाबत गंभीर पाऊले उचलत थेट नेरळ पोलीस ठाणे गाठत शिक्षिका यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. तर नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी तक्रार दाखल होताच बस व आरोपी चालक यांना नेरळ पोलीस ठाणे येथे हजर करत आरोपीला जेरबंद केले आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे भादंवि कलम ३५४, बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८, १२ पॉस्को नुसार कारवाई केली आहे. तर आरोपीने न्यायालयात हजर करण्यात यापुढील कारवाई नेरळ पोलिसांकडून करण्यात येत आहे.