देहराडून- उत्तराखंडमधील केदारनाथ धाममध्ये एक भीषण अपघात घडला आहे. दरड कोसळून तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे. केदारनाथ पादचारी मार्गावर हा अपघात झाला आहे. ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबले गेल्याची शक्यता आहे. अपघाताची माहिती मिळताच बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात म्हणजे पावसाळ्यात डोंगरी भागात धोकादायक परिस्थितीचे उदाहरण आहे. पावसाळ्यात दरड कोसळणे, रस्ते खचणे, पूर येणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते.
याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, रविवारी सकाळी 7.30 च्या सुमारास आपत्ती नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली की केदारनाथ यात्रा मार्गावर दरड कोसळली. यात्रेकरू गौरीकुंड-केदारनाथ पादचारी मार्गावर केदारनाथच्या दर्शनासाठी जात होते. परंतु अचानक चिरबासाजवळील टेकडीचा काही भाग खचला आणि दुर्घटना घडली. या दुर्घटनेत अनेक यात्रेकरू जमिनीखाली गाडले गेले. माहिती मिळताच एनडीआरएफ, डीडीआर, वायएमएफची पथके घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू करण्यात आले.
बचाव पथकाने ढिगाऱ्यातून तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले. बाकी आठ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातारण तयार झाले आहे. दरम्यान, गौरीकुंड ते केदारनाथ असा १६ किलोमीटर अंतराचा पायी मार्ग आहे. याठिकाणी सातत्याने भूस्खलनाच्या घटना घडत असतात. खास करून पावसाळ्यात अशा घटनांमध्ये वाढ होत असते. मागच्या वर्षी अशाच प्रकारच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळेच हा मार्ग जोखमीचा म्हटला जातो.