रत्नागिरी – विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन पूर्ण सज्ज आहे. जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील १,७४७ मतदान केंद्रावर सुमारे ४.५० कोटींच्या मुलभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. प्रत्येक केंद्रावर सीसी टिव्हीची नजर असणार आहे. जिल्ह्यातील १३ लाख २३ हजार ४१३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यामध्ये २०,८७१ युवा मतदार पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोकणात येणाऱ्या गोवा बनावटीच्या मद्यासह अंमली पदार्थांच्या तस्करीवर करडी नजर ठेवली जाणार आहे. विविध विभागाचे पथक तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्याअंतर्गत ५तपासणी नाक्यांवर कडक वाहनांची तपासणी केली जाणार आहे.दारु, ड्रग्ज व रोकड जप्तीसाठी अधिक दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही स्पष्ट करून जिल्ह्यात पोस्टर, कटआऊट, बॅनर असे जवळपास 5 हजारहून अधिक जाहिरात साहित्य जप्त करण्यात आल्याचेही जिल्हाधिकार्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठी 1 कोटी 26 लाख रुपये मतदान केंद्र दुरुस्तीसाठी देण्यात आले आहेत तर सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्ही बसवण्यासाठी तीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ज्येष्ठ नागरिक व 85 वर्षाहून अधिक मतदारांना मतदान करण्यासाठी व त्यांच्या मदतीसाठी कर्मचार्यांबरोबरच एनसीसी व एनएसएसच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. जिल्ह्यात पाचही मतदार संघातील मतदारांमध्ये पुरुषांची संख्या 48 टक्के तर महिलांची संख्या 52 टक्के इतकी आहे. जिल्ह्यात 6,925 दिव्यांग मतदार आहेत. जिल्ह्यात 1747 मतदान केंद्र असून यात 32 नवीन केंद्रांचा समावेश आहे. शहरी भागात 184 तर ग्रामीण भागात 1563 मतदान केंद्र असल्याचे जिल्हाधिकारी सिंह यांनी सांगितले.
जिल्ह्यातील हिस्ट्रीशिटरवर नजर
जिल्ह्यात पाच चेकनाके आंतरजिल्हा बॉर्डरवर तयार करण्यात आले असून याठिकाणी अचानक भेटी दिल्या जाणार आहेत. जिल्ह्यात पोलिसांच्या मदतीला 120 जणांची केंद्रीय औद्योगिक बलाची कंपनी दाखल करण्यात झाली आहे. सध्या हिस्ट्रीशिटरची यादी तयार केली जात असून त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे.