ब्रेकिंग न्यूज-लांजातील ७५ वर्षीय वृद्धेच्या खुनाचा अवघ्या १२ तासांत उलगडा; संशयित आरोपी पोलिसांच्या जाळ्यात!…

Spread the love

सोन्याच्या दागिन्यांसाठी ज्येष्ठ महिलेची हत्या; चोरीचा संशय टाळण्यासाठी हातात घातल्या नकली बांगड्या…

कर्जबाजारीपणातून गुन्हा केल्याची आरोपीची कबुली; रत्नागिरी जिल्हा पोलिसांची वेगवान तपासकामगिरी

*लांजा | प्रतिनिधी-* लांजा तालुक्यातील वेरवली रामगाव येथील लाडवाडी परिसरात ७५ वर्षीय ज्येष्ठ महिला वैशाली विलास हेगिष्टे यांच्या हत्येने संपूर्ण परिसर हादरला होता. सोन्याच्या दागिन्यांसाठी करण्यात आलेल्या या हत्येचा रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत छडा लावत संशयित आरोपीला अटक केली आहे. प्रमोद प्रकाश खेडेकर (रा. वेरवली खुर्द, कातळवाडी, ता. लांजा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आरोपीने दागिन्यांच्या लालसेतून हा गंभीर गुन्हा केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

*भरदिवसा घरात घुसून वृद्धेची हत्या…*

सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा ते साडेअकराच्या दरम्यान वैशाली हेगिष्टे या घरी एकट्याच असल्याची संधी साधून आरोपीने घरात प्रवेश केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांची हत्या करून त्यांच्या हातातील सोन्याच्या दोन बांगड्या आणि दोन पाटल्या जबरदस्तीने काढून घेतल्याचे तपासात समोर आले.

विशेष म्हणजे, चोरीचा संशय येऊ नये आणि दागिने लुटल्याचे सहज लक्षात येऊ नये, यासाठी आरोपीने वृद्धेच्या हातात नकली बांगड्या घातल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

*पोलिसांची तपासचक्रे वेगाने फिरली…*

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे आणि राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या नेतृत्वाखाली तीन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली.

गोपनीय माहिती, संशयितांची पडताळणी आणि सायबर व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. त्यातून घटनास्थळापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या प्रमोद खेडेकर याच्यापर्यंत तपास पोहोचला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, कर्जबाजारीपणामुळे गुन्हा केल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

*१२ तासांत तपासाला यश…*

भरदिवसा घडलेल्या या गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत छडा लावणे हे रत्नागिरी जिल्हा पोलिसांसमोरील मोठे आव्हान होते. मात्र, विविध पथकांमधील समन्वय, गोपनीय माहितीचे संकलन आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ३०९(४) आणि ३३२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका…*

या कारवाईत पोलीस अधिकारी देवकन्या मैदाड, अमोद सरंगले, संदीप ओगले, प्रशांत बोरकर तसेच पोलीस अंमलदार सचिन भुजबळराव, नितेश राणे, प्रियांका कांबळे, प्रतीक्षा राणे, संजय मारळकर, विजय आंबेकर, गणेश सावंत, योगेश नार्वेकर, भैरवनाथ सवाईराम, दत्ता कांबळे आणि अतुल कांबळे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

वृद्ध महिलेच्या हत्येचा अवघ्या १२ तासांत तपास उलगडल्याने रत्नागिरी जिल्हा पोलिसांच्या वेगवान कारवाईची चर्चा सुरू झाली आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासातून घडलेल्या या घटनेने ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page