जनशक्तीचा दबाव न्यूज | पुणे | सप्टेंबर १०, २०२३.
गेल्या महिन्याभरापासून दडी मारलेल्या पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सक्रिय होण्यास सुरुवात केली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या २४ तासांपासून जोरदार पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्येही दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं मुंबईकर सुखावले आहे. परंतु आता पुढील एक ते दोन दिवसांत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. याशिवाय राज्यातील तब्बल २९ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि विदर्भातील अकोला, बुलढाणा, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासांत जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरीत मात्र पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी पावसाचा अंदाज पाहून प्रवासाची तयारी करावी.
तसेच शेतकऱ्यांनी हवामान अंदाज घेत शेतीच्या कामांना सुरुवात करण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून संततधार पाऊस होत आहे. त्यामुळं विभागातील अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये सतत होत असलेल्या पावसामुळं गंगापूर आणि दारणा धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळं गोदावरी नदी पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळं नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.