पुणे- महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वीच दाखल झालेल्या मोसमी पावसाची गती मंदावल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकण, पुणे आणि साताऱ्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर, विदर्भासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकण, पुणे, सातारा या जिल्ह्यांतील काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भात काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात मान्सूनने हजेरी लावली असली तरी अद्याप संपूर्ण विदर्भात पावसाला सुरुवात झालेली नाही. अजूनही बरेच जिल्हे पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबईत हवामान खात्याने पावासाचा यलो अलर्ट दिला आहे. तर पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. पुढील दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्याच्या बऱ्याचशा भागांत पावसाने उसंत घेतली असून विदर्भात मान्सूनच्या पावसाची प्रतिक्षा आहे. पावसाअभावी विदर्भात कमाल तापमान चाळशीपार पोहोचले. बुधवारी ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वात उच्चांकी ४१.३ अंश तापमानाची नोंद झाली. तर, भंडारा, चंद्रपूर येथेही उकाडा कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि साताऱ्यातील काही भागांत आज जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे वादळी वारा आणि वीजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.