देवरूख कनिष्ठ महाविद्यालयात ‘जागतिक जल दिन’ संपन्न….

Spread the love

देवरूख- पृथ्वीवर पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असले तरी त्यातील केवळ २.५% पाणी वापरासाठी योग्य आहे, बाकी सर्व पाणी खारे असल्याने पुढील पिढीसाठी पाणी संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. महाराष्ट्र राज्यात पाणी प्रामुख्याने घरगुती वापरासाठी, औद्योगिक उपयोगासाठी, सिंचनाकरिता आणि पर राज्यांना देण्यासाठी वापरले जाते. परंतु पाण्याचा पुनर्वापर अजिबात होत नाही ही गंभीर बाब आहे. या सर्व चर्चेचे निमित्त होते ते म्हणजे देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित ‘जागतिक जल दिना’चे. या मार्गदर्शनापर कार्यक्रमाचे आयोजन कनिष्ठ महाविद्यालयातील प्रसिद्धी विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने  करण्यात आले होते.

जल किंवा पाणी या महत्वपूर्ण घटकाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी, तसेच पाणी बचत व संवर्धनाबाबत जाणीव निर्माण व्हावी हा या मार्गदर्शनामागील महत्त्वाचा उद्देश होता. प्रसिद्धी विभाग समन्वयक प्रा. धनंजय दळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जागतिक जल दिनाची यावर्षी संकल्पना ‘हिमनदी संवर्धन’ असल्याचे सांगितले. हिमनद्यांमुळे स्वच्छ व शुद्ध पाण्याचा साठा निर्माण होतो. त्यामुळे हिमनद्या मानवासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यांचे संवर्धन व संरक्षण झाल्यास भविष्यात पिण्याचे व शेतीचे पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल, असे प्रतिपादन केले. पाण्याचा विविध प्रकारे होणारा अपव्यय टाळला पाहिजे. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत विविध कारणांनी प्रदूषित झाल्याने त्या पाण्याचा वापर घातक बनत आहेत, यावर कायमस्वरूपी ठोस उपाय करण्याची गरज याप्रसंगी प्रा. दळवी यांनी व्यक्त केली. भारतातील एकूण धरणांपैकी ३६% धरणे एकट्या महाराष्ट्रात असूनदेखील आज महाराष्ट्र ‘पाणीबाणी’च्या कड्यावर उभा आहे.

भूजलाचा मुख्य स्त्रोत पाऊस आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरले पाहिजे, परंतु ते पाणी नदीत जाऊन पुढे समुद्राला मिळते हा अपव्यय थांबला पाहिजे. कोकण विभागाचा विस्तार राज्याच्या भौगोलिक तुलनेत १०% असून, येथील पर्जन्यमान राज्याच्या तुलनेस ४०% असले तरी उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते ही गंभीर बाब असल्याचे याप्रसंगी नमूद केले. पाणी बचत व संवर्धनासाठी प्रत्येकाने करावयास कृती याबाबत सविस्तर विवेचन केले. जागतिक जल दिनाच्या निमित्ताने पाण्याबाबतची गंभीर समस्या अधोरेखित करणाऱ्या पोस्टरबाबतची माहिती याप्रसंगी देण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा शेट्ये यांनी विद्यार्थ्यांना पाण्याच्या शुद्धतेचे व पाणी सुरक्षेचे महत्त्व, पावसाच्या पाण्याचे संकलन करण्याच्या कार्यपद्धती, पाणी संवर्धन व भूजल पातळी वाढावी यासाठी सर्वांनी करायचे प्रयत्न याबाबत सविस्तर माहिती दिली.

जलव्यवस्थापन, जलसंवर्धन, जलसंसाधनांचे महत्त्व, टाकाऊ पाण्याचा पुनर्वापर, भूजल पातळी वाढीसाठी उपाय, पाण्याच्या बचती संदर्भातील उपाय, पावसाच्या पाण्याची साठवणूक याबाबत आढावा घेतला. कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागांने विविध गावात पाणी संकलन व संवर्धनासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याचा आढावा याप्रसंगी घेतला. विविध गावांनी जलसंवर्धनाचेद्वारे केलेला कायापालट, भूजल पातळी वाढवण्याचे सोपे उपाय, सांडपाण्याची पुनर्वापर प्रक्रिया, ग्रामीण जलसंवर्धन प्रक्रिया, पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्याच्या घरगुती पद्धती, कमी पाण्यात केली जाणारी शेती व बागायती याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या वर्गांच्या व्हाट्सअप ग्रुपवर जलविषयक महत्त्वपूर्ण माहिती पाठवण्यात आली. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनसाठी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, राहुल फाटक, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम आर लुंगसे आणि सर्व शिक्षक व  शिक्षकेतर कर्मचारी यांनी आयोजकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

*फोटो-* विद्यार्थ्यांनी साकारलेली जलविषयक समस्या अधोरेखित करणारी पोस्टर्स.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page