रत्नागिरी- राज्यात निर्यात क्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी, रोजगार निर्मितीचे लक्ष साध्य करण्यासाठी आणि डीस्ट्रीक्ट अॕज एक्सपोर्ट हब उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी निर्यात प्रचालन कार्यशाळेचे आयोजन केल्याचे कोकण विभागाच्या उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ यांनी सांगितले.
अल्पबचत सभागृह येथे आज जिल्हा उद्योग केंद्रामार्फत आयोजित निर्यात प्रचालन कार्यशाळेचे उद्घाटन झाले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सीमा शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल गायकवाड, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर, इंडिया पोस्टचे गजानन करमरकर, बँक ऑफ बडोदाचे चीफ मॅनेजर सुधीर प्रजापती, फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्टीक चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू सावंत, लोटे परशुराम इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अॕड. राज आंब्रे, संचालक शिरीष चौधरी, एमपीइडीएचे उपसंचालक गिबिन कुमार, मत्सविभागाचे सहाय्यक आयुक्त आनंद पालव,आदी उपस्थित होते.
श्रीमती शिरसाठ म्हणाल्या, असोसिएशन, उद्योजक यांच्यासोबत बँकर्स आणि शासकीय अधिकारी हे एकमेकांमध्ये समन्वय साधत चांगल काम करत आहे, चांगला प्रतिसाद देत आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत आणि विभागाचे प्रधान सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग विभागाने मागील दोन वर्षात मोठ्या प्रमाणावर काम करत उत्तुंग भरारी घेऊन विविध योजनांमध्ये मोठी कामगिरी केली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर काम झाले आहे. निर्यात क्षेत्रातही महाराष्ट्राने मोठी झेप घेतली असून, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. निर्यातीमध्ये महाराष्ट्राचे 5 लाख 56 हजार कोटी एवढे योगदान आहे, ज्यामध्ये कोकणाचे 1 लाख 39 हजार कोटी एवढे तर जिल्ह्याचे 6 हजार कोटीचे योगदान आहे. चालू वर्षामध्ये निर्यातीमधील जिल्ह्याचे योगदान वाढविण्याच्या दृष्टीने काम करु या.
निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजकांना इन्फ्रास्टक्चर, स्टँप ड्युटी, वीज बील आदी बाबींवर देण्यात येणाऱ्या इन्सेटीव्हीची माहिती त्यांनी दिली. उद्योजकांना कोणतीही अडचण असेल तर त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा, शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ सर्व उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. जिल्ह्यातील उद्योजक, नवउद्योजक यांना जिल्हा उद्योग केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सुविधा, त्यांच्यासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, शासनाच्या विविध योजनांची माहिती श्रीमती शिरसाठ यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्वलन करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाव्यवस्थापक श्री. आजगेकर यांनी तर सूत्रसंचालन पूर्वा पेठे आणि संकेत कदम यांनी केले. कार्यशाळेला उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना प्रक्रिया उत्पादक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.