सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीबाबत केलेल्या वक्तव्याविरुद्ध अभिनेत्रीने तक्रार दाखल केली होती. यावर आता आयोगाने प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई प्रतिनिधी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेत भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमधील कार्यक्रमात धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत अभिनेत्री प्राजक्ता माळीने काल म्हणजेच २८ डिसेंबरला पत्रकार परिषद घेत या सगळ्या प्रकारावर आपला रोष व्यक्त केला. “सुरेश धस तुम्ही माझाच नाही तर सर्व महिलांचा अपमान केला आहे. तुम्ही माझी माफी मागा”, अशी मागणी प्राजक्ताने केली आहे.
“ही बाब फक्त माझ्यापुरती निगडीत राहिलेली नसून माझ्या कुटुंबियांनाही याचा त्रास होत आहे” असं म्हणत पत्रकार परिषदेत प्राजक्ता माळी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, या प्रकरणी प्राजक्ता माळीने कठोर पाऊल उचलत सुरेश धस यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार नोंदवली होती. यावर आता महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आयोगाच्या वतीने प्रतिक्रिया दिली आहे.
रुपाली चाकणकर यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे, “अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची तक्रार आयोग कार्यालयास प्राप्त झाली आहे. त्याचा अभ्यास करून, कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार आयोग करेल. महिलांबाबत समाज माध्यमांसमोर बोलताना सर्वांनी भान ठेवलं पाहिजे,कारण संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे सर्व क्षेत्रांमध्ये महिला स्वतःच्या कर्तुत्वावर काम करत आहेत आणि काम करत असताना समाज माध्यमांद्वारे केवळ त्या महिला आहेत म्हणून कोणताही पुरावा नसताना माध्यमांमध्ये त्यांच्या बाबतीत बदनामी करणारे वक्तव्य व त्याआधारे समाज माध्यमात सर्व घटकांनी शहानिशा न करता अतिशय घाणेरड्या पद्धतीने ट्रोल करणे याबाबत शासनाकडून कठोर कारवाई करणे बाबत आयोग पुढाकार घेईल.”
महाराष्ट्रातील राजकारण्यांना अशा प्रकारची भाषा शोभत नाही, असे सांगत सुरेश धस यांनी माझी माफी मागावी, अशी मागणी अभिनेत्री प्राजक्ता माळीने शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली. या प्रकरणी आपण महिला आयोगाकडे तक्रार केल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालावे अशी विनंतीही तिने यावेळी केली होती. आता या प्रकरणी सुरेश धस यांच्यावर कोणती कारवाई करण्यात येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.